नऊ षटकांच्या सामन्यात भारताचा पाच धावांनी विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

"टी-10' या प्रकाराचा आयसीसीकडून अजून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला नसला तरी भारत-वेस्ट इंडीज महिलांमधला चौथा "टी-20' सामना प्रत्येकी नऊ षटकांचा झाला आणि अवघ्या 50 धावा करणाऱ्या भारतीयांनी पाच धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामनाही जिंकला.

प्रॉविडन्स : टी-10 या प्रकाराचा आयसीसीकडून अजून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला नसला तरी भारत-वेस्ट इंडीज महिलांमधला चौथा "टी-20' सामना प्रत्येकी नऊ षटकांचा झाला आणि अवघ्या 50 धावा करणाऱ्या भारतीयांनी पाच धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामनाही जिंकला.

प्रतिकुल परिस्थितीत प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताने नऊ षटकांत 50 धावा करताना सात फलंदाज गमावले. पूजा वस्त्रकारच्या 10 धावांचा अपवाद वगळता इतर सर्व जण एकेरीच धावा करू शकल्या. चेंडूमागे एक धाव एवढेही समीकरण नसताना भारतीय गोलदाजांनी वेस्ट इंडीजची नाकेबंदी केली. या दरम्यान केवळ पाच फलंदाज बाद होऊनही विंडीजला विजयासाठी प्रयत्न करता आले नाहीत.

फिरकी गोलंदाज अनुजा पाटीलची कामगिरी भारताच्या या विजयात मोलाची ठरली. तिने दोन षटकांत अवघ्या आठ धावा देताना दोन विकेट मिळवल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी एकेका विकेटचे योगदान दिले, भारताकडून एकाच फलंदाजाकडून दुहेरी धावसंख्या करता आली असली तरी विंडीजकडून हेली मॅथवेस (11), शिनले हेन्री (11) आणि नताशा मॅक्‍लेन (10) या तिघांनी दुहेरी धावा केल्या; तरीही भारतीय गोलंदाज भारी ठरल्या.

सामना नऊ षटकांचा झाल्यामुळे प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करताना भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेल्या. 6 बाद 32 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पूजा वस्त्रकारने 10 चेंडूत 10 धावांची खेळी केल्यानंतर तानिया भाटियाच्या आठ धावा मोलाच्या ठरल्या.

संक्षिप्त धावफलक ः भारत ः 9 षटकात 7 बाद 50 (शेफाली वर्मा 7, जेमिमा रॉड्रिग्ज 6, वेदा कृष्णमूर्ती 5, हरमनप्रित कौर 6, पूजा वस्त्रकार 10, तानिया भाटिया नाबाद 8, मॅथवेस 2-0-13-3, ऍफी फ्लेचर 2-0-2-2, शेनेटा ग्रीमोद 2-0-10-2) वि. वि. वेस्ट इंडीज ः 9 षटकांत 5 बाद 45 (मॅथवेस 11, शिनले हेन्री 11, नताशा मॅक्‍लेन 10, दीप्ती शर्मा 2-0-8-1, राधा यादव 2-0-8-1, अनुजा पाटील 2-0-8-2)

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india womens' won by 5 runs in nine over match