अखेरच्या चेंडूवर भारताला विजेतेपद

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

कोलंबो - मिताली राजच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या हरमनप्रीत कौरने अखेरच्या चेंडूवर भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा एक विकेटने पराभव करणाऱ्या भारतीय संघाने महिला विश्‍वकरंडक क्रिकेट पात्रता स्पर्धेत विजेतेपद मिळवले. भारताच्या विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. 

कोलंबो - मिताली राजच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या हरमनप्रीत कौरने अखेरच्या चेंडूवर भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा एक विकेटने पराभव करणाऱ्या भारतीय संघाने महिला विश्‍वकरंडक क्रिकेट पात्रता स्पर्धेत विजेतेपद मिळवले. भारताच्या विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. 

सुपर सिक्‍समध्येही भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. आज मात्र विजयासाठी त्यांना अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला २४४ धावांत रोखणाऱ्या भारताची अखेरच्या सात षटकांत घसरगुंडी उडाली होती. अखेरच्या षटकांत नऊ धावांची गरज असताना नववी फलंदाज बाद झाली. त्यामुळे हरमनप्रीतवरचे दडपण वाढले होते. दोन चेंडूंत आठ धावांची गरज असताना तिने षटकार मारला आणि अखेरच्या चेंडूवर आवश्‍यक दोन धावा वसूल करून भारताला चित्तथरारक विजय मिळवून दिला.

हरमनप्रीतने ४१ चेंडूंत नाबाद ४१ धावा करताना २ चौकार आणि एक षटकार मारला. तिने एकमेव षटकार शेवटून दुसऱ्या चेंडूवर मारला. भारताच्या या विजयात हरमनप्रीतसह मोना मेश्राम (५९) आणि दीप्ती शर्मा (७१) यांनीही मोलाचे योगदान दिले, तर गोलंदाजीत शिखा पांडे (४१ धावांत २) आणि राजेश्‍वरी गायकवाड (५१ धावांत ३) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

थिरुष कामिनी लवकर बाद झाली असली, तरी मोना आणि दीप्ती यांनी २५ षटकांत १२४ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली; मात्र या दोघीही पाठोपाठ बाद झाल्या. त्यानंतर हरमनप्रीतने प्रथम वेदा कृष्णमूर्ती आणि शिखा पांडेसह डाव सावरला, त्या वेळी भारताचा विजय सोपा वाटत होता. 

विजयासाठी ४२ चेंडूंत ४१ धावांची गरज आणि सहा फलंदाज शिल्लक अशी स्थिती होती; परंतु त्यानंतर १३ चेंडूंत चार फलंदाज बाद झाले. ४ बाद २०४ वरून आठ बाद २२३ अशी अवस्था झाली. अखेरच्या षटकांत नऊ धावांची गरज असतानाही पूनम यादव धावचीत झाली होती; परंतु हरमनप्रीतने यशस्वीपणे किल्ला लढवला.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ः सर्वबाद २४४ (लिझेली ली ३७ -३१ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, मिगॉन डू प्रीझ ४०, डेन वॅन नेक्रिक ३७, सून लुस ३५ -२९ चेंडू, २ चौकार, २ षटकार, शिखा पांडे ८-०-४१-२, राजेश्‍वरी गायकवाड ९-०-५१-३) पराभूत वि. भारत ः ५० षटकांत ९ बाद २४५ (मोना मेश्राम ५९ -८२ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, दीप्ती शर्मा ७१ -८९ चेंडू, ८ चौकार, वेदा कृष्णमूर्ती ३१ -२७ चेंडू, ३ चौकार, हरमनप्रीत कौर नाबाद ४१ -४१ चेंडू, २ चौकार, १ षटकार, मारिझन कॅप १०-०-३६-२, अयाबोंगा खाका १०-१-५५-२)

Web Title: India won the last ball