World Cup 2019 : हिटमॅनची खेळी हिट; भारताचा सहा गडी राखून विजय

बुधवार, 5 जून 2019

कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरीसच्या षटकांना खेळून काढल्यावर भारतीय फलंदाजांनी बाकीच्या गोलंदाजांसमोर धावा बरोबर जमा केल्या. रोहितने 23वे एक दिवसीय शतक साजरे केले तेव्हा प्रेक्षकांसोबत समालोचन करणारे माजी दिग्गज खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.  
 

वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना थोड्या अंतराने बाद करण्यात यश आल्याने धावफलकाला आकार मिळाला नाही. युझवेंद्र चहलने चार फलंदाजांना बाद करून छाप पाडली. 228 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने झकास शतक ठोकले. फक्त 4 गडी गमावून भारताने 48व्या षटकात विजयी धावा काढल्या.   

विजयाकरता 228 धावांचा पाठलाग चालू केल्यावर शिखर धवनला कंगिसो रबाडाने मस्त आउटस्वींग चेंडू टाकून बाद केले. कप्तान कोहलीने बाहेर जाणार्‍या चेंडूची छेड काढताना विकेट गमावली. अत्यंत अडखळत सुरुवात करणार्‍या रोहित शर्माने मी फलंदाजीची सूत्र हाती घेत झोकात फटकेबाजी केली. नजर बसल्यावर रोहित शर्मा सगळे फटके सहजी मारत होता. शमसीला त्याने मारलेला षटकार लांब सीमारेषाला पार करून दहा ओळी आत जाऊन पडला.

रोहितने लोकेश राहुल सोबत चांगली भागीदारी रचून डाव स्थिरावला. राहुल चांगला खेळत असताना रबाडाला विचित्रपद्धतीने खेळून झेलबाद झाला. ‘‘दक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यातील अनुभव डोक्यात ठेवून संघ निवडला स्थानिक वातावरण आणि खेळपट्टी बघून नाही. दोन फिरकी गोलंदाज भारताविरुद्ध खेळवले तिथेच त्यांचे गणीत चुकले’’, सचिन तेंडुलकरने भेटल्यावर विश्लेषण करताना सांगितले. कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरीसच्या षटकांना खेळून काढल्यावर भारतीय फलंदाजांनी बाकीच्या गोलंदाजांसमोर धावा बरोबर जमा केल्या. रोहितने 23वे एक दिवसीय शतक साजरे केले तेव्हा प्रेक्षकांसोबत समालोचन करणारे माजी दिग्गज खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.  

शेवटच्या 50 धावा काढताना 6 ची सरासरी राखायची होती. शम्सीने टाकलेल्या 43व्या षटकात 14 धावा चोपून दोघा फलंदाजांनी धावगती आटोक्यात आणली. त्यातून रबाडाच्या गोलंदाजीवर रोहितचा अत्यंत सोपा झेल डेव्हिड मिलरने सोडला. मग रोहित शर्मा आणि धोनीने मिळून 74 धावांची भागीदारी पूर्ण केली. विजयाला  थोड्या धावा बाकी असताना धोनी 34 धावांवर बाद झाला. रोहितने नाबाद 122 धावांवर राहून विजयाला गवसणी घातली.   

त्या अगोदर भारताची गोलंदाजी चालू केल्यावर जसप्रीत बुमराने आपल्या दुसर्‍याच षटकात अनुभवी हशीम आमलाला बाद केले. टप्पा पडून बाहेर जाणार्‍या चेंडूवर आमलाचा उडालेला झेल रोहित शर्माने बरोबर पकडला. पाठोपाठ बुमराने धोकादायक क्वींटन डिकॉकला बाद केले. डिकॉकने जोरदार आडव्या बॅटचा फटका मारायचा केलेला प्रयत्न चुकला. वेगाने उडालेला झेल कोहलीने पकडला. कप्तान फाफ डु प्लेसीसला त्यानंतर अनेकवेळा भसकन उडालेल्या चेंडूने त्रास दिला. डु प्लेसीसने संयम राखत किल्ला लढवला. मोठे फटके मारायचा मोह डु प्लेसीस आणि डुसेनने टाळला.  डुसेन- डु प्लेसीसने कष्टाने अर्धशतकी भागीदारी रचली पण धावगतीला वेग मिळत नसल्याचे दडपण डुसेनला झेपले नाही. युझवेंद्र चहलला रिव्हर्स स्वीप मारताना डुसेन चक्क पायामागून बोल्ड झाला. चहलने त्यावर समाधान मानले नाही. पुढच्या षटकात चहलने जम बसलेल्या फाफ डु प्लेसीसला गुगली टाकून बोल्ड केले. 

डेव्हिड मिलर आणि पेहलुक्वायोने जबाबदारी ओळखून फलंदाजी केली. दोघे फलंदाज हवेतून फटके मारणे टाळत होते. भागीदारी तोडायला कोहलीने चहलला परत गोलंदाजीला बोलावले. चहलने लगेच 31 धावांवर खेळणार्‍या मिलरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल बाद केले. पेहलुक्वायोचा संयम चहलने भंग केला आणि धोनीने त्याला 34 धावांवर स्टंप केले. चहलने आपल्या 10 षटकात 4 फलंदाजांना बाद करून कमाल कामगिरी केली. तळात ख्रिस मॉरीस (42 धावा) आणि रबाडाने मोलाची 66 धावांची भागीदारी रचल्याने डाव लवकर आटोपला नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian beats South Africa by 6 wickets in World Cup 2019