INDvsSA : भारतीय गोलंदाजांची कमाल; दिवसभरात 16 फलंदाज बाद

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भारतीय गोलंदाजांनी एकत्र मिळून तिसर्‍या दिवशी एक ना दोन तब्बल 16 फलंदाजांना बाद करून रांची कसोटीत धमाल उडवली. गोलंदाजांनी तिखट मारा करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपवला.

रांची : भारतीय गोलंदाजांनी एकत्र मिळून तिसर्‍या दिवशी एक ना दोन तब्बल 16 फलंदाजांना बाद करून रांची कसोटीत धमाल उडवली. गोलंदाजांनी तिखट मारा करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपवला. भारतीय संघाच्या हाती 335 धावांची भरभक्कम आघाडी लागली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देत परत फलंदाजीला बोलावले. पहिल्या दोन दिवसांप्रमाणे रांचीच्या मैदानावर पावसाने गोंधळ घातला नाही. दुसर्‍या डावाच्या सुरुवातीलाच उमेश यादव- महंमद शमी जोडीने दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडवली. तिसर्‍या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची दुसर्‍या डावातील अवस्था 8 बाद 132  झाली होती. म्हणजेच चौथ्या दिवशी भारतीय संघ मालिका 3-0 जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करेल.    

हो आम्ही आहोत बंडखोर, भारत दौराही रद्द करु; बांगलादेशची धमकी

तिसर्‍या दिवशीच्या खेळाच्या प्रारंभाला उमेश यादवने कप्तान फाफ डु प्लेसीसची उजवी स्टंप हादरवली. टप्पा पडून अगदी एक स्टंप चेंडू बाहेर स्वींग झाला आणि डुप्लेसी चकला. चौथ्या विकेटकरता झुबेर हमझा आणि टेंबा बवुमाने दडपणाखाली मस्त फलंदाजी केली. हमझाच्या फलंदाजीत सहजता दिसली. त्याने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना चांगले फटके मारत अर्धशतक ठोकले. 91 धावांची भागीदारी झाल्यावर झुबेर हमझाला रवींद्र जडेजाने चकवले. प्रथम त्याच्या विरुद्ध झालेले पायचीतचे अपील फेटाळले गेले. रोहित शर्माने हमझा उगाच पुढे खेळतो आहे असे जडेजाला मुद्दाम सांगितले. पुढच्याच चेंडूवर हमझा मागे सरकून खेळला. चेंडू टप्पा पडून बाहेर वळण्याऐवजी भसकन आत आला आणि डाव्या स्टंपवर आदळला.

Image

समोरून शाहबाज नदीमने चेंडूला उंची देत टेंबा बवुमाला फसवले. बवुमा पुढे सरकून खेळताना साफ चकला आणि क्षणार्धात वृद्धीमान सहाने बेल्स उडवत त्याला बाद केले. नदीमचा तो पहिला कसोटी बळी ठरला. हेन्रीक क्लासेनला जडेजाने बोल्ड करताना टाकलेला चेंडू स्वप्नवत होता. मधल्या स्टंपवर टप्पा टाकून जडेजाने चेंडू वळवला तो उजव्या स्टंपचा भेदून गेला. उपहारानंतर पीड्टला शमीने पायचित तर रबाडाला उमे यादवने थेट स्टंपवर चेंडू फेकून धावबाद केले. त्यानंतर 18 षटके नवोदित जोडी नोरजे आणि जॉर्ज लींड यांनी खेळपट्टीवर तग धरला.

एकाच कसोटीत खेळतायत दोन राखीव खेळाडू

गोलंदाजीला परत आल्यावर उमेश यादवने जॉर्ज लींडला बाद केले तेव्हा वेगवान झेल रोहित शर्माने पकडला. उरलेल्या शेवटच्या फलंदाजाला बाद करायला वेळ गेला नाही. उमेश यादवने 3 तर जडेजा, नदीम आणि शमीने प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले. आश्चर्याची बात म्हणजे अश्विनला एकही बळी मिळाला नाही.

Image

पहिला डाव परवडला अशी वाताहत दुसर्‍या डावात होताना बघायला मिळाली. उमेश यादवने जणू खेळता न येणारा चेंडू टाकून डिकॉकची उजवी स्टंप फिरायला पाठवली. महंमद शमीने पहिल्या डावात अर्धशतक ठोकणार्‍या झुबेर हमझाला बोल्ड आणि कप्तान फाफ डु प्लेसीसला पायचित केले. जेव्हा टेंबा बवुमाला शमीने सहाकडे झेल द्यायला भाग पाडले तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळलेला बघायला मिळाला. धैर्य दाखवत वेगवान मार्‍याला तोंड देणार्‍या डीन एल्गरला उमेश यादवचा बाऊंन्सर खाडकन डोक्यावर आदळला तेव्हा काळजात धस्सं झाले. पंचांनी त्याच क्षणाला चहापानाची घोषणा केली.

Image

 नवीन बॉल, दोन गोलंदाज अन् दोन क्लिनबोल्ड!

डोक्यावर झालेल्या आघाताने चहापानानंतर डीन एल्गर फलंदाजीला आला नाही. नवीन नियमानुसार मूळ संघात नसलेल्या डीब्रुईनने त्याची जागा फलंदाजीला घेतली. पहिल्या डावाप्रमाणे जॉर्ज लींडने थोडा प्रतिकार केला. नदीमच्या दक्ष क्षेत्ररक्षणामुळे जॉर्ज लींड धावबाद झाल्यावर पाहुण्या संघाला पराभव समोर दिसू लागला. खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेचा धावफलक 8 बाद 132 चे चित्रं दाखवत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian bowlers took 16 wickets in a day in 3rd test