जागतिक बॉक्‍सिंगमध्ये ऐतिहासिक यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अमित फंगल आणि मनीष कौशिक यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे आणि भारताची किमान दोन पदके निश्‍चित केली आहेत. या कामगिरीमुळे भारतीय पुरुष बॉक्‍सरनी एकाच स्पर्धेत प्रथमच दोन पदके जिंकली आहेत.

मुंबई : अमित फंगल आणि मनीष कौशिक यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे आणि भारताची किमान दोन पदके निश्‍चित केली आहेत. या कामगिरीमुळे भारतीय पुरुष बॉक्‍सरनी एकाच स्पर्धेत प्रथमच दोन पदके जिंकली आहेत.

रशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत अमितने 52 किलो, तर मनीषने 63 किलो गटातील पदक निश्‍चित करताना उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी आता आगामी लढत जिंकली तर ते या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठलेले पहिले भारतीय पुरुष बॉक्‍सर ठरतील.

यापूर्वी विजेंदर सिंग (2009), विकास क्रिष्णन (2011), शिवा थापा (2015) आणि गौरव बिधुरी (2017) यांनी जागतिक स्पर्धेत ब्रॉंझ जिंकले आहे, पण एकाच स्पर्धेत भारताने प्रथमच दोन पदके जिंकली आहेत. दरम्यान, द्वितीय मानांकितास पराजित केलेला संजीत 91 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला.

भारताच्या सर्वाधिक आशा असलेल्या अमितने फिलिपिन्सच्या कार्लो पालम याला 4-1 असे हरवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत अमितने पालमला 3-2 हरवले होते, तर यावेळी त्यापेक्षा सरस कौल मिळवला. अमितची सुरुवात चांगली नव्हती, पण त्याने त्यानंतरच्या दोन फेऱ्यांत आक्रमण करीत विजय मिळवला. माझी सुरुवात संथ होती, पण त्यानंतर मार्गदर्शकांनी आक्रमण करण्याचा सल्ला दिला. तो योग्य ठरला, असे अमितने सांगितले. आता त्याची लढत त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आहे, पण आम्ही व्यूहरचना तयार करणार आहोत, असेही तो म्हणाला.

पहिलीच जागतिक स्पर्धा खेळणाऱ्या मनीषने ब्राझीलच्या वॅंडेरसन डे ओविव्हेरा याला 5-0 असे हरवले. पहिल्या फेरीत दोघात चांगली चुरस होती, पण त्यानंतर मनीषच्या ताकदवान ठोशांनी लढतीचा निर्णय केला. आता त्याची लढत अव्वल मानांकित अँडी गोमेझ क्रूझ (क्‍यूबा) याच्याविरुद्ध आहे. दरम्यान, संजीतने टॉरेसला चांगले आव्हान दिले. तो प्रतिस्पर्ध्याच्या ताकदवान ठोशांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकला नाही. संजीतचे आक्रमण चपळ टॉरेसने चुकवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian boxer excel in world championship