INDvBAN : कॅप्टन कोहलीने उलगडले यशाचे रहस्य, काय म्हणाला पाहा (व्हिडिओ)

IND-Virat-Kohli
IND-Virat-Kohli

कोलकाता : ''कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. जिथे खेळाडूंचा कस लागतो वगैरे गोष्टी नुसत्या बोलून चालणार नाहीत, तर सर्व मंडळांना विचार करून त्यावर कृती करावी लागेल. सध्याच्या जमान्यात आम्ही सगळे व्यावसायिक खेळाडू आहोत. क्रिकेट खेळणे हे आमचे रोजीरोटीचे साधन आहे. तेव्हा कसोटी क्रिकेटला प्राधान्य देऊन त्याचा योग्य आर्थिक मोबदला खेळाडूंना मिळेल याकडे मंडळांना ध्यान द्यावे लागेल,'' असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. कोलकाता येथे झालेली बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.  

जर कसोटीत 30 षटके टाकून घाम गाळणार्‍या कौशल्यपूर्ण आणि कष्टकरी गोलंदाजापेक्षा टी-20 सामन्यात चार षटके गोलंदाजी करणार्‍या गोलंदाजाला जास्त आर्थिक मोबदला मिळत असेल, तर कोणालाही कसोटी क्रिकेट खेळण्यात रस कसा वाटेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करार पद्धतीत जाणीवपूर्वक कसोटी क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूचा अर्थकारणाचा करार सर्वोत्तम ठेवण्याकडे लक्ष दिले गेले आहे.

विराट पुढे म्हणाला, "मला वाटते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट नियामक मंडळही त्याच उपाययोजना करत आहेत, म्हणून कसोटी क्रिकेट संघात यायला खेळाडू जिवाचे रान करताना दिसतात. कसोटी क्रिकेटमधे सर्वोत्तम कामगिरी करणे मानाचे समजतात. मी पुन्हा सांगतो, नुसते बोलून चालणार नाही, तर कृती करावी लागेल.''

भारतीय संघाने आयसीसी टेस्ट चँम्पियनशिप चालू झाल्यापासूनच्या सलग 7 कसोटी सामन्यात विजय संपादला आहे, ज्याचे समाधान वाटते. ही लय कायम ठेवायला आम्हांला परदेशात जाऊन चांगली कामगिरी करायची तयारी करावी लागेल. हे सुद्धा लक्षात ठेवावे लागेल की, आम्ही अंतिम सामन्याकरता पात्र ठरलो तरी अगोदरच्या चांगल्या कामगिरीची पुण्याई कामाला येणार नाही. त्या सामन्यातील 5 दिवसांत दर्जेदार क्रिकेट खेळायची हिंमत ठेवावी लागेल.

वेगवान गोलंदाजांबद्दल सांगायचं झाल्यास उमेश यादव, महंमद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार असे 5 चांगले गोलंदाज आपल्या संघाकरता सदैव सज्ज आहेत. यातील बहुतेक सर्वांना उत्तम अनुभव आहे. ईशांत तर 100 कसोटी सामन्याच्या जवळ येऊन ठेपला आहे. एकमेकांच्या यशात ते आनंद घेत आहेत. त्यांचा व्यायाम, आहार आणि सरावाच्या बाबतीत ते स्वयंप्रेरित आहेत. आम्ही फक्त विचारपूर्वक त्यांच्यावर अति खेळाचा ताण येत नाही ना याकडे बारकाईने लक्ष देत आहोत.

भारतीय संघ सध्या कोणत्याच गोष्टी गृहीत धरत नाही. चांगला खेळ होत असला तरी कोणी कष्ट करण्यात मागे हटत नाही. यश मिळत असले तरी कोणाचा अजून सुधारणा करण्याचा ध्यास कमी होत नाही की, सर्वोत्तम कामगिरी करायची भूक शमत नाहीये. सर्व खेळाडूंना या संघात खेळण्याचा आनंद मिळतो आहे आणि अभिमान वाटतो आहे. मला वाटते की, यशाचे हेच रहस्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com