विराटला कर्णधारपदाची भीती?; झटकली विश्रांतीची मनस्थिती

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराट सातत्याने खेळत आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेनंतर अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यानंतर न्यूझीलंडमधील ट्‌वेन्टी-20 मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती. पण विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएलचे सर्व सामने तो खेळला होता.

मुंबई : तिन्ही प्रकारात खेळत असल्यामुळे मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मालिकेनंतर अधून मधून विश्रांती घेणारा विराट कोहली आता विश्रांतीची मनस्थिती झटकून कामाला लागणार असल्याचे संकेत मिळत आहे. काही दिवसांनंतर सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजच्या पूर्ण दौऱ्यात विराट खेळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात तीन ट्‌वेन्टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 3 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर असा त्याचा कालावधी आहे. दीड महिन्याची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळल्यानंतर विराट कोहली विंडीज दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिकेतून माघार घेण्याची शक्‍यता वर्तवली जात होती, परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपदापासून दूर राहिल्यानंतर आता कोहलीने विश्रांतीचा विचार दूर करून खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराट सातत्याने खेळत आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेनंतर अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यानंतर न्यूझीलंडमधील ट्‌वेन्टी-20 मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती. पण विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएलचे सर्व सामने तो खेळला होता. मात्र विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएलचे ठराविक सामने आपण खेळू असे त्याने सांगितले होते.

कर्णधारपदाची भीती?
विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागल्यामुळे टीका होऊ लागली आहे, त्यातच आता कसोटी आणि झटपट क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याची चर्चा जोर धरू लागली असल्यामुळे विराट विश्रांतीपेक्षा खेळणे पसंत करत असल्याचे बोलले जात आहे.

. . . . . .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian cricket team captain Virat Kohli play in West Indies tour