2003 मधील विश्वविजेत्या कांगारूंइतकाच भारत सक्षम

cricket
cricket

विश्वकरंडकात सहभागी झालेला भारताचा संघ पाहून मला 2003 मध्ये जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची आठवण येते. त्यांच्याकडे कोणत्याही खेळाडूसाठी पर्याय आहेत आणि कोणचेही संघातील स्थान अढळ नाही. शेन वॉर्नला वादग्रस्त आणि कटू परिस्थितीत निरोप घ्यावा लागल्यानंतर रिकी पाँटिंग याने हाच मंत्र सांगितला होता. विराटने अशाच धर्तीवर भाष्य केले तर ते उचितच ठरेल. वॉर्न तेव्हा ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरूनही कांगारूंनी जगज्जेतेपद मिळविले होते. भारतीय संघ सुद्धा सक्षम राखीव फळीच्या जोरावर अंतिम ध्येय साध्य करू शकेल.

भारताचा पुढील प्रतीस्पर्धी अफगाणिस्तान आहे. हा सामना भारताने लिलया जिंकायला हवा. अफगाण संघाला खास करून या सामन्यात छाप पाडायला आवडेल. महंमद नबी आणि रशीद खान असे खेळाडू काहीतरी सिद्ध करण्याच्या निर्धाराने खेळतील, पण दर्जातील तफावत पाहता त्यांच्यासमोर अशक्यप्राय आव्हान असेल. क्रिकेटमधील अमर्याद अनिश्चीतता लक्षात घेतली तरी केवळ पावसाचा व्यत्यय न आल्यास या सामन्याचा निकाल आधीच स्पष्ट झालेला असेल.

पाकिस्तानविरुद्ध शिखर धवन खेळणार नाही हे उघड होताच बरीच चर्चा झडली. राहुलने केलेला खेळ बघता सलामीबाबतच्या सर्व शकांना पूर्णविराम मिळाल्याची मला खात्री वाटते. गुणवत्तेचा निकष लावल्यास स्पर्धेत आघाडीवर असलेल्या इतर सर्व संघांच्या तुलनेत भारत बराच आघाडीवर आहे. धवनची जागा रिषभ पंत याने घेतली आहे. पंत हा एक असा आकर्षक फलंदाज आहे जो आधीपासूनच संघात असायला हवा होता. भारताकडे असलेली पर्यायी खेळाडूंची फळी अशी सक्षम आहे. प्रत्येक क्रमांकासाठीच अशी फार उत्तम स्थिती आहे. भुवनेश्वर कुमारची जागा महंमद शमी घेऊ शकतो. पंतला घेण्यासाठी केदारला वगळायचे की जायबंदी झालेल्या विजय शंकरला काढायचे असा पेच निर्माण झालेला असेल. मला वाटते की पुढील सामन्यांसाठी पंतला स्पर्धात्मक सराव मिळावा म्हणून त्याला आताच खेळविले पाहिजे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध तो सहाव्या क्रमांकावर कमालीचा उपयुक्त ठरू शकेल. सध्याच्या परिस्थितीत केदारची गोलंदाज म्हणून उणीव विराटला जाणवेल असे वाटत नाही. याचे कारण आतापर्यंत तीन सामन्यांत त्याला एकदाच गोलंदाजी देण्यात आली आहे. पंत संघाला गरजेचा असलेला फिनिशीर ठरू शकेल.

दुसरीकडे बांगलादेशला हरविल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तात्पुरती आघाडी मिळाली असेल, पण त्यांचे सहा सामन्यांतील पाच पैकी तीन विजय बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध मिळालेले आहेत. यावेळी विंडीजचा संघ जेतेपदाचा दावेदार नाही. त्यातच ते सध्या दाखवित असलेला फॉर्म बघता त्यांच्यावरील विजय फार वरच्या दर्जाचा मानता येणार नाही. पाकिस्तानवरील विजयाच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होते. मला जो मुद्दा मांडायचा आहे तो असा की कांगारू आघाडीवर कितीही बलाढ्य वाटत असले तरी त्यांनी अजूनही बरेच काही सिद्ध करून दाखविणे बाकी आहे. गोलंदाजीतील त्यांच्या मर्यादा भारताने फार खराब पद्धतीने उघड केल्या. कमकुवत बांगलादेशने सुद्धा 382 धावांच्या आव्हानासमोर 333 धावा करून क्षणभर खळबळ उडविली होती.

मला कोणत्याही प्रकारे अनादर करायचा नाही, पण मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, मार्कस स्टॉयनीस आणि नॅथन कुल्टर-नाईल यांच्यासारखे गोलंदाज असलेला संघ बांगलादेशविरुद्ध 330 पेक्षा जास्त धावा देत असेल तर मी त्यांना फार उच्च टक्केवारी प्रदान करू शकत नाही. माझा यावर विश्वासच बस नाही. आता इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका असे कांगारूंचे पुढील प्रतिस्पर्धी डोळ्यासमोर आणा आणि विचार करा. इंग्लंडविरुद्ध त्यांची नक्कीच तीव्र कसोटी लागेल. इंग्लंडचा संघ सुद्धा फलंदाजी-गोलंदाजी-क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांत फार ताकदवान वाटतो आहे. न्यूझीलंडच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होते. लुंगी एन्गीडी याच्या गैरहजेरीत आफ्रिकेची भेदकता कमी होते. तो संघात परतला आणि त्यांच्याविरुद्ध विजय मिळाला तर त्यास थोडा अर्थ असेल. उरलेल्या तीन पैकी एक सामना जिंकला तरी कांगारूंचे उपांत्य फेरीतील स्थान नक्की होईल, पण भारताविरुद्ध गाठ पडू नये म्हणून त्यांना तिन्ही सामने जिंकणे क्रमप्राप्त असेल. सध्याच्या परिस्थितीत हे अवघड दिसते. पर्याय मिळाल्यास उपांत्य प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी इंग्लंड किंवा न्यूझीलंड यांच्यातून निवड करावी. भारताविरुद्ध खेळण्याची त्यांची इच्छा नसेल हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com