टीम इंडियात याला नाही मिळाली संधी;  आता खेळणार या देशाकडून

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

आपल्या देशाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते, असेच स्वप्न झारखंडच्या इशान पांडेनेही जपले होते. पण टीम इंडियाच सोडा भारत अ संघातही आता स्पर्धा वाढली आहे.

नवी दिल्ली :  आपल्या देशाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते, असेच स्वप्न झारखंडच्या इशान पांडेनेही जपले होते. पण टीम इंडियाच सोडा भारत अ संघातही आता स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत आपला निभाव कसा लागणार याची चिंता इशानला लागून राहिली पण करियर तर करायचेय मग त्याने धाडसी निर्णय घेतला आणि आता तो नेपाळच्या संघातून खेळणार आहे. 

नेपाळ असो की संयुक्त अरब अमिराती असो, काही भारतीयांनी या संघातून आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे. इशान पांडेही आता त्याच मार्गावर आहे. डावखुरा फलंदाज असलेला इशान सिंगापूरमध्ये होणाऱ्या तिरंगी स्पर्धेत तो नेपाळकडून खेळणार आहे. 27 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत नेपाळ, सिंगापूर आणि झिम्बाब्वे या तीन देशांचा समावेश आहे. 

कोण आहे इशान? 
इशान पांडे उत्तराखांडच्या हरिद्वारमधील कनखल परिसरात रहातो. भारताच्या युवा संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने जोरदार प्रयत्न केले, पण तेथपर्यंत आपण पोहचू शकत नाही याची त्याला जाणीव झाली. वडिलांच्या सल्यानुसार तो क्रिकेट खेळण्यासाठी नेपाळमध्ये राहू लागला. काठमांडू येथील एका वैद्यकीय महाविद्यालयातून तो एमबीएचे शिक्षण घेत आहे. अभ्यास करता करता तो क्रिकेटही खेळत राहिला. प्रथम त्याला नेपाळच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. या संघातून चांगली कामगिरी केल्यांतर त्याची नेपाळच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Cricketer Ishan Pandey to play from nepal