भारतीय फुटबॉल संघास हाउसफुल प्रतिसाद कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे वारे वाहत असतानाच इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या आगामी दोन्ही लढती हाउसफुल जाणार हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या उद्याच्या (ता. 7) अखेरच्या साखळी लढतीत नवोदितांना संधी देण्याचा भारतीय संघ विचार करीत आहे. ही स्पर्धा अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल एरिना येथे सुरू आहे. 

मुंबई - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे वारे वाहत असतानाच इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या आगामी दोन्ही लढती हाउसफुल जाणार हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या उद्याच्या (ता. 7) अखेरच्या साखळी लढतीत नवोदितांना संधी देण्याचा भारतीय संघ विचार करीत आहे. ही स्पर्धा अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल एरिना येथे सुरू आहे. 

भारताच्या तैवानविरुद्धच्या लढतीस अल्प प्रतिसाद लाभल्यानंतर कर्णधार सुनील छेत्रीने "शिव्या घाला, पण मैदानात या' असे आवाहन केले होते. त्यास अनुसरून केनियाविरुद्धची लढत हाउसफुल झाली. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचीच नव्हे, तर रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीचीही सर्व तिकिटे संपली असल्याचे महाराष्ट्र फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी ही तिकिटे दोन दिवसांपूर्वीच संपली असल्याचेही आवर्जून नमूद केले. 

भारतीय फुटबॉल संघ या स्पर्धेत बहरात आहे. भारताने तैवानविरुद्ध पाच तर केनियाविरुद्ध तीन गोल करताना एकही गोल स्वीकारलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह भारत या स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार याबाबत कोणालाही शंका नाही. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत. 

पावसात झालेल्या केनियाविरुद्धच्या लढतीने भारतीय खेळाडूंना चांगलेच थकवले आहे. त्यावेळी बचावपटू झिंगान पडलाही होता. तो खेळण्याची शक्‍यता कमी आहे. तिशी पार केलेल्या सुनील छेत्रीऐवजी बलवंत सिंगला संधी देण्याचा विचार सुरू आहे. केनियाविरुद्धची लढत छेत्रीची शंभरावी लढत होती, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जेजे लालपेखलुआ याची पन्नासावी लढत आहे. "भारताविरुद्धची लढत नक्कीच खडतर आहे, पण आम्ही भारतासमोर आव्हान निर्माण करण्यास सज्ज आहोत', असे न्यूझीलंड मार्गदर्शक फ्रिटझ्‌ श्‍मिड यांनी सांगितले.

Web Title: Indian Football team has continue responded Housefull