जिंकले तरच फुटबॉल संघास पात्रतेची आशा

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात भारतास एकही विजय लाभलेला नाही. या परिस्थितीत उद्या ओमानला त्यांच्या भूमीत पराजित केल्यासच भारतास आशा असेल.

मुंबई / मस्कत : विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात भारतास एकही विजय लाभलेला नाही. या परिस्थितीत उद्या ओमानला त्यांच्या भूमीत पराजित केल्यासच भारतास आशा असेल.

ओमानविरुद्ध मायदेशात अखेरच्या दहा मिनिटात दोन गोल स्वीकारत भारताने 1-0 आघाडीवरून हार पत्करली. आशियाई विजेत्या कतारला रोखत उंचावलेल्या अपेक्षांना भारताने बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या निष्प्रभ बरोबरींनी जणू मूठमाती दिली. तीन बरोबरी आणि एक परभव ही कामगिरी असलेला भारत गटात शेवटून दुसरा आहे; तर ओमान गटात दुसरे आहेत.

भारताने मंगळवारी ओमानला हरवले, तर पात्रतेच्या आशा कायम राहतील. अर्थात गटातील उपविजेतेपदही पुरेसे नाही. मात्र, या लढतीत हार टाळल्यास किमान आशियाई पात्रतेच्या आशा उंचावतील. गोलच्या दवडलेल्या संधींचा भारतास या स्पर्धेत फटका बसला आहे. "ओमानच्या कामगिरीत खूपच सुधारणा झाली आहे. या वेळी त्यांचेच पारडे सरस असेल. आव्हान सोपे नसल्याची आम्हाला जाणीव आहे,' असे भारताचे मार्गदर्शक इगॉर स्तिमॅक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या लढतीपूर्वी
- प्रतिस्पर्ध्यातील आठ लढतीत भारताचा एकच विजय आणि पाच पराभव
- भारताचा एकमेव विजय 1994 मध्ये.
- प्रतिस्पर्ध्यातील विश्‍वकरंडक पात्रता लढतीत 2004 मधील गोलशून्य बरोबरी हीच भारतासाठी जमेची बाब, उर्वरित पाच सामन्यात पराभव
- चार वर्षांपूर्वीच्या पात्रता स्पर्धेत भारताचा ओमानमधील लढतीत 0-3 पराभव
- थेट प्रक्षेपण रात्री 8.30 पासून स्टार स्पोर्टस्‌

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian football team have to win to stay alive in qualification tournament