'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'

'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'

मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले. 

आठव्या मिनिटास गोल स्वीकारल्यावर भारताने विश्रांतीनंतर चांगला प्रतिकार करीत आघाडी घेतली; पण चार मिनिटे असताना बरोबरीचा गोल स्वीकारला. बेल्जियमच्या खेळाचा चांगला अभ्यास केला होता आणि त्यांच्या जोरदार आक्रमणाची तयारी होती, असेही मार्गदर्शकांनी सांगितले. 

विश्रांतीपूर्वी आम्ही चेंडूचा पाठलाग करीत होतो. चेंडूवर वर्चस्व घेता येत नव्हते. उत्तरार्धात उभे पास देण्याची योजना यशस्वी ठरली. विश्रांतीपूर्वीच्या अतिवेगवान खेळामुळे बेल्जियम थकले होते. आम्ही डबल टॅकलिंग केले. चेंडूवर ताबा असताना तसेच नसतानाही वेग कायम राखला. यात फिटनेस निर्णायक ठरला. या संघाची तंदुरुस्ती ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी एवढा तंदुरुस्त संघ कधीही पाहिलेला नाही, असेही मार्गदर्शकांनी सांगितले. 

चेंडूवर वर्चस्व असो अथवा नसो, खेळाचा वेग कायम ठेवायचा. या परिस्थितीत प्रतिस्पर्ध्यांकडून चुका होतातच. आक्रमक हॉकी हा आमचा यूएसपी आहे. त्याबाबत आम्ही तडजोड करणार नाही. बचावात्मक हॉकी आम्हाला जमणारच नाही, असे मार्गदर्शकांनी सांगितले. अखेरच्या लढतीत लक्ष्य ठेवूनच खेळणार. जर तरचा विचारही करणार नाही. सध्या गटात अव्वल आहोत, तेच स्थान राखण्याचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. 

अखेरच्या मिनिटात स्वीकारलेला गोल हे दुर्दैव नाही. बचावात आमची चूक झाली होती. चेंडूचा ताबा मिळवणे ही एक कला आहे; पण तो मिळविल्यावर गमावणे ही आत्महत्याच आहे. 
- हरेंदर सिंग, भारतीय मार्गदर्शक 

भारताची सरस कामगिरी 
- स्पर्धेत भारताचे सर्वाधिक 7 गोल 
- स्पर्धेत भारताचा सर्वाधिक 41 वेळा गोलक्षेत्रात प्रवेश 
- स्पर्धेतील सर्वाधिक मैदानी गोलच्या क्रमवारीत भारत (4) नेदरलॅंड्‌सपाठोपाठ (5) दुसरा 
- सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत सिमरनजित सिंग (3) संयुक्त अव्वल 

आजचे सामने 
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (संध्याकाळी 5) 
आयर्लंड वि. चीन (संध्याकाळी 7) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com