विराटच्या समावेशासह भारतीय संघ जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख सलामीवीर असेल. 

इंग्लंड दौऱ्यातील अपयश शिखर धवनने कालच संपलेल्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत धुवून काढले. तरीही निवड समितीने त्याचा विचार केला नाही. हा प्रमुख बदल वगळता इतर मोठे बदल करण्यात आले नाहीत. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली तर ईशांत शर्मा आणि हार्दिक पंड्या तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांचा विचार करण्यात आला नाही. 

आशिया करंडक स्पर्धेतून माघार घेणाऱ्या विराटला मनगटाच्या दुखापतीमुळे विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात होती; परंतु तंदुरुस्तीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या समावेशासह संघ आज रात्री जाहीर करण्यात आला. विराटसह अश्‍विनही तंदुरुस्त ठरला आहे. 

बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमार यांना आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे महम्मद सिराज आणि उमेश यादव यांना संधी मिळाली आहे. सिराजने भारत "अ' संघातून भरीव कामगिरी करून लक्ष वेधले होते; तर मुंबईच्या शार्दुल ठाकूरने स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना 4 ते 9 ऑक्‍टोबरदरम्यान राजकोट तर दुसरा सामना हैदराबादला 12 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. 

संघ : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महम्मद शमी, उमेश यादव, महम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

Web Title: The Indian team announced including Virat