भारताने रचला 622 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज निष्प्रभ

शुक्रवार, 4 जानेवारी 2019

चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे.

सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली. चेतेश्वर पुजाराच्या 193 धावा आणि रिषभ पंतच्या नाबाद 159 धावांचे योगदान मोलाचे ठरले. रिषभ पंत-रवींद्र जडेजा भागीदारीचे द्विशतक पार झाल्यावर दुसर्‍या दिवशीच्या खेळातील दहा  षटके बाकी असताना विराट कोहलीने डाव घोषित केला. 

pujara

चेतेश्वर पुजारा गोलंदाजांना अजून किती सतावणार हे बघायला 20 हजार प्रेक्षक सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सिडनी क्रिकेट मैदानावर जमा झाले. संयमाचा गुण मनात भरून आणलेल्या पुजाराने कोणतीच घाई न करता नव्याने डाव चालू केला. हनुमा विहारीने पुजारा सोबत योग्य फलंदाजी करत शतकी भागीदारी पूर्ण केली. अर्धशतकापासून आठ धावा दूर असताना विहारी लायनला झेल बाद झाला. दीडशे धावा केल्यानंतर पुजाराला द्विशतकाची ओढ लागली. ऑस्ट्रेलियात द्विशतक करणार्‍या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या पंगतीत चेतेश्वरला बसायचे होते. 

नऊ तास फलंदाजी करून थकलेल्या पुजाराची एकाग्रता थोडी भंग पावली. 193 धावांवर लायनच्या गोलंदाजीवर त्याचा झेल ख्वाजाने सोडला. त्याच धावसंख्येवर लायनने पुजाराला चेंडूला उंची देऊन चकवले आणि स्वत:च झेल पकडून त्याची प्रदीर्घ खेळी संपवली. मैदानातील सर्व प्रेक्षक, समालोचन करणारे माजी खेळाडू आणि दोन्ही संघातील खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवत पुजाराला मानवंदना देताना बघायला मिळाले.

अगोदरच्या तीन डावात खराब फटका मारून विकेट गमावलेल्या रिषभ पंतने समंजस फलंदाजी करून थकलेल्या गोलंदाजांना अजून त्रास दिला. मधूनच मोठे फटके मारत असल्याने टीम पेनने क्षेत्ररचना पांगवली. पंतने मग हुशारीने  मोकळ्या जागेत चेंडू ढकलून पळून धावा काढायचा सपाटा लावला. चहापानाला पंत 88 धावा काढून नाबाद परतला तेव्हा धावसंख्या सहा बाद 491 होती. 

चहापानानंतर रिषभ पंतने सहज शतकाला गवसणी घातली. रिषभ पंतच्या खेळीने आणि जडेजा सोबतच्या भागीदारीने भारताला 500 धावांचा टप्पा पार करता आला. टीम पेनने शरणागतीचा पांढरा रुमाल दाखवत उस्मान ख्वाजाला गोलंदाजी दिली. रवींद्र जडेजाचे अर्धशतक आणि संघाचा साडे पाचशेचा पल्ला पार करूनही विराट कोहलीने डाव घोषित केला नाही म्हणल्यावर टीम पेनने तिसरा नवा चेंडू घेतला. 

167 षटके आणि सात बाद 622  धावांचा डोंगर उभा झाल्यावर कोहलीने डाव घोषित केला. जडेजा 81 धावांवर बाद झाला आणि रिषभ पंत 159 धावांवर नाबाद परतला.

Web Title: Indian team scores 622 runs in fourth test match