लष्कराच्या सेवेसाठी धोनीचा दोन महिने ब्रेक; आता नव्या यष्टीरक्षकाचे काय?

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

धोनीचा ब्रेक ठरलाच होता? 
महेंद्रसिंग धोनी विश्वकरंडक स्पर्धेतील दुखापतीमुळे सुरवातीस खेळणार नसल्याचे सांगितले जात होते; पण त्याला कोणत्याही परिस्थितीत विंडीज दौऱ्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय झाला होता. अर्थात, याबाबत कोहलीची भूमिका निर्णायक ठरणार होती. ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा लक्षात घेऊन रिषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचा विचार होत आहे.

नवी दिल्ली / मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या रोज वावड्या उठत असताना आता भारतीय क्रिकेट मंडळानेच त्याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीची संघनिवड धोनीमुळे चर्चेत राहू नये यासाठी भारताच्या माजी कर्णधाराने लष्कराची सेवा करण्यासाठी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला असल्याचे सांगितले. 

वेस्ट इंडीज दौऱ्यापासून नवोदित खेळाडूंना विशेषतः यष्टिरक्षकांना तयार करण्याचे काम महेंद्रसिंग धोनी करणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे त्याचा संघात समावेश केला जाणार; पण तो एकही सामना खेळणार नाही, त्याऐवजी नवोदितांसाठी मेंटॉरचे काम करणार असे सांगितले जात होते; पण आता धोनीने दोन महिने मानद लेफ्टनंट कर्नल या नात्याने पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद सेवा करण्याचे ठरवले आहे, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नाही, त्याऐवजी तो दोन महिने निमलष्करी दलाच्या सेवेत असेल. त्याने याबाबतचा निर्णय यापूर्वीच घेतला होता आणि त्याची आम्हाला कल्पना दिली होती, असे सांगताना भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धोनीने निवृत्तीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही हेही स्पष्ट केले. 

विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पराजित होणार हे स्पष्ट झाल्यावर काही वेळातच धोनी लगेच निवृत्त होणार अशा वावड्या पसरण्यास सुरवात झाली होती. आता तो वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल, हा निर्णय निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद, तसेच कर्णधार विराट कोहली यांना कळविण्यात आला आहे. 

धोनीचा ब्रेक ठरलाच होता? 
महेंद्रसिंग धोनी विश्वकरंडक स्पर्धेतील दुखापतीमुळे सुरवातीस खेळणार नसल्याचे सांगितले जात होते; पण त्याला कोणत्याही परिस्थितीत विंडीज दौऱ्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय झाला होता. अर्थात, याबाबत कोहलीची भूमिका निर्णायक ठरणार होती. ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा लक्षात घेऊन रिषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचा विचार होत आहे. त्याचबरोबर राखीव यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहा असेल, असेही सांगितले जात आहे. धोनीने आयपीएल खेळण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आगामी काही महिन्यांत ट्‌वेंटी 20 लढती जास्त खेळणार आहे. त्यामुळे विश्वकरंडक 20 स्पर्धेत धोनी असणार का, हा विचार करूनच सर्व काही ठरवले जाणार होते. सध्याच्या निवड समितीची मुदत ऑक्‍टोबरमध्ये संपणार आहे, त्यामुळे ते या सर्व प्रक्रियेत कर्णधार कोहलीस सहभागी करून घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian wicket keeper Mahendra Singh Dhoni takes break for 2 months