चौथ्या हॉकी कसोटीत भारतीय महिलांचा पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

भारतीय महिला हॉकी खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तिसरा सामना जिंकल्यानंतर रविवारी त्यांना स्पेनविरुद्ध चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पाच सामन्यांच्या मालिकेत त्या 1-2 अशा पिछाडीवर पडल्या आहेत. 

माद्रिद (स्पेन) - भारतीय महिला हॉकी खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तिसरा सामना जिंकल्यानंतर रविवारी त्यांना स्पेनविरुद्ध चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पाच सामन्यांच्या मालिकेत त्या 1-2 अशा पिछाडीवर पडल्या आहेत. 

भारतीय महिलांना चौथ्या सामन्यात 1-4 असा पराभव पत्करावा लागला. स्पेनकडून लोला रिएरा हिने 10 आणि 34व्या मिनिटाला, तर ल्युसिया जिमेनेझ (19वे) आणि कार्मेन कॅनो (37वे) यांनी अन्य गोल केले. भारताचा एकमात्र गोल उदिताने 22व्या मिनिटाला केला. 

स्पेनने पहिल्या सामन्यात विजय मिळविला होता. त्यानंतर दुसरा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. तिसऱ्या सामन्यात भारताने 3-2 अशी बाजी मारली. पण चौथ्या सामन्यात त्यांना सातत्य राखता आले नाही. 

सामन्याची सुरवातच वेगवान आणि आक्रमक करताना स्पेनच्या खेळाडूंनी भारतीयांवर दडपण ठेवले. त्यांनी पहिल्या पाच मिनिटांत दोन कॉर्नर मिळविले. पहिल्या 20 मिनिटांत स्पेनने निर्विवाद वर्चस्व राखले. यात त्यांनी दोन गोल करून आघाडी मिळवली. 

त्यानंतर टप्प्याटप्प्याने भारतीय महिलांनी आपला खेळ उंचावण्यास सुरवात केली. एकवेळ भारतीय खेळाडू स्पेनवर दडपण ठेवण्यात यशस्वी झाले होते. पण, त्यांना मिळविलेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. यात उदिताने नोंदविलेल्या गोलचे समाधान मात्र त्यांना लाभले. अर्थात त्यानंतर त्यांना खेळात सातत्य राखता आले नाही. 

तिसऱ्या सत्रात पुन्हा एकदा स्पेनच्या खेळाडू आक्रमक झाल्या. त्यांनी मिळविलेला कॉर्नर अवैध पद्धतीने अडवल्याने मिळालेल्या स्ट्रोकवर त्यांनी आघाडी मिळवली. त्यानंतर तीनच मिनिटांनी मैदानी गोल करून त्यांनी आघाडी भक्कम केली. भारतीय महिलांनीदेखील या दरम्यान काही चांगल्या चाली रचला. मात्र, त्यांनी स्पेनची गोलरक्षक मिलेनिए गार्सिया हिला चकवता आले नाही. स्पेनने आपला बचाव भक्कम राखून विजयावर शिक्कामोर्तब केले. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सोमवारी होईल.

Web Title: Indian women lose to Spain in fourth game