महिला हॉकी संघाने ब्रिटनला 1-1 रोखले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या कसोटीतील पराभवातून शिकलो असल्याचे दाखवताना दुसऱ्या कसोटीत ब्रिटनला 1-1 बरोबरीत रोखले. मिरलॉन येथील पाच कसोटींच्या मालिकेत ब्रिटन आघाडीवर आहेत.

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या कसोटीतील पराभवातून शिकलो असल्याचे दाखवताना दुसऱ्या कसोटीत ब्रिटनला 1-1 बरोबरीत रोखले. मिरलॉन येथील पाच कसोटींच्या मालिकेत ब्रिटन आघाडीवर आहेत.

ब्रिटनने दुसऱ्या कसोटीतही आघाडी घेतली होती, पण लालरेमसियामी हिने 32 व्या मिनिटास बरोबरी साधली. खरं तर पहिल्या दोन मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर मिळवत भारताने ब्रिटनला धक्का दिला होता, पण त्यावर गोल करणे भारतास जमले नाही. त्याचवेळी पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे पेनल्टी स्ट्रोकमध्ये आणि त्याचे गोलात रूपांतर करीत ब्रिटनने पहिल्या सत्रात आघाडी घेतली.

भारताने दुसऱ्या सत्रातही जोरदार सुरुवात केली होती. पेनल्टी कॉर्नर मिळवले, गोलक्षेत्रात वारंवार प्रवेशही केला, पण गोल काही झाला नाही. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीस लालरेमसियामी हिने भारतास बरोबरी साधून दिली. हा गोल स्वीकारल्यावर ब्रिटननेही प्रतिआक्रमणावर भर दिला, पण त्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

अखेरच्या सत्रात भारतीय संघाने चेंडूवर चांगली हुकूमत राखली. गोलक्षेत्रातही प्रवेश करण्यात एकतर्फी वर्चस्व राखले. लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण ब्रिटनचा बचाव भेदण्यात अपयश आल्याने भारतास अखेर बरोबरीवर समाधान मानावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian womens hockey team hold britain