भारताचा विकास क्रिशन सर्वोत्कृष्ट बॉक्‍सर

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय बॉक्‍सिंगच्या इतिहासाला रविवारी नवी झळाळी आली. भारताचा आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास क्रिशन याची आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग संघटनेच्या वतीने या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉक्‍सर म्हणून निवड करण्यात आली. जागतिक संघटनेच्या ७०व्या वार्षिक सोहळ्यात २० डिसेंबर रोजी त्याला हा पुरस्कार दिला जाईल.

नवी दिल्ली - भारतीय बॉक्‍सिंगच्या इतिहासाला रविवारी नवी झळाळी आली. भारताचा आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास क्रिशन याची आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग संघटनेच्या वतीने या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉक्‍सर म्हणून निवड करण्यात आली. जागतिक संघटनेच्या ७०व्या वार्षिक सोहळ्यात २० डिसेंबर रोजी त्याला हा पुरस्कार दिला जाईल.

जागतिक संघटनेनेच्या वतीने ही बातमी त्याला कळविण्यात आली. भारताचा एखादा बॉक्‍सर प्रथमच अशा पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. विकास सध्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत न्यू जर्सी येथे आहे. विकासने २०१० मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४ मध्ये ब्राँझपदक मिळविले होते. यावर्षी विकास आशियातील दोन व्यावसायिक लढतीदेखील खेळला आहे. यातील पहिल्या लढतीत तो पराभूत झाला; पण याच वर्षी दिल्लीत झालेल्या दुसऱ्या लढतीत त्याने केनियाच्या निक्‍सन अबाका याचा पराभव केला. आशियाई क्रमवारीत अबाका सध्या आठव्या स्थानावर आहे. 

हरियानाच्या विकासने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतही दोन ब्राँझपदके मिळविली आहेत. तो म्हणाला,‘‘हा पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. जेव्हा असा पुरस्कार मिळविणारा मी एकमेव भारतीय आहे असे समजले, तेव्हा माझा आनंद द्विगुणित झाला. आता बचावातील उणिवा दूर करण्यासाठी आपण प्रशिक्षणासाठी अमेरिकेची निवड केली.’’ भविष्यातील योजनांविषयी बोलताना विकास म्हणाला, ‘‘छोटी लक्ष्ये समोर ठेवून मी पुढे जाणार आहे. सध्या मी पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. एक व्यावसायिक बॉक्‍सर म्हणून मी प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे बचावाची कला अधिक चांगल्या प्रकारे मला आत्मसात करायची आहे. मला आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू व्हायचे आहे. त्यासाठी माझ्याकडे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. या वेळी अखेरच्या क्षणापर्यंत मला थांबायचे नाही.

मेरीला विशेष पुरस्कार
याच समारंभात भारताची महिला बॉक्‍सर मेरी कोम हिचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. बॉक्‍सिंग खेळात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तिला ‘लिजेंड्‌स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

Web Title: India's best boxer Vikas Krishan