भारत-आफ्रिका लढतीला इंद्रू नागाचा डंख

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू नागाचा डंख बसल्याचा आरोप होत आहे.

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू नागाचा डंख बसल्याचा आरोप होत आहे.

धर्मशालामधील आंतरराष्ट्रीय लढत पावसामुळे वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी धर्मशालातील इंद्रू नागदेवतेची पूजा करीत असत. ही देवता पावसावर नियंत्रण राखते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. हिमाचल प्रदेश संघटनेचे पदाधिकारी त्यासाठी या देवतेची यापूर्वी पूजा करीत असत; पण या वेळी या देवतेला प्रसन्न करण्यात आले नाही आणि त्यामुळे लढत वाया गेली असल्याची चर्चा आहे.

इंद्रु नागदेवतेची पूजा झाली होती. मैदानावरील ड्रेनेज व्यवस्था चांगली असूनही हे कसे घडले, अशी विचारणा काही रसिकांकडून होत आहे. मात्र लगेच त्याला इंद्रू नागमंदिराच्या परिसरात दुपारी चारपासून रिमझिम पाऊस अधूनमधून होता, त्याच वेळी त्यापासून सात-आठ किलोमीटर असलेल्या स्टेडियम परिसरात दुपारी चारनंतर पावसाचा जोर वाढला, याकडे लक्ष वेधले.

इंद्रू नागदेवता प्रसन्न न झाल्याची कारणेही सांगितली जात आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटना पदाधिकारी प्रत्येक सामन्यापूर्वी इंद्रू नागाची पूजा करतात, तशीच त्यांनी या वेळीही केली. पण त्याची वेळ चुकली, असे काहींचे म्हणणे आहे. हे पदाधिकारी पूजा करण्यासाठी गेले होते; पण त्या वेळी ही देवता प्रवासाला गेली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर ही देवता आठ दिवस प्रवासाला जाते आणि त्याच कालावधीत पूजा झाली, असाही काहींचा दावा आहे.

पाऊस थांबल्याचा जल्लोषही; पण...
लढत सुरू झाल्यानंतर काही वेळातच रद्द केल्यामुळे चाहते चिडले होते. स्टेडियमला जाणाऱ्या रस्त्यावर कमालीचे खड्डे आहेत. त्या मार्गावरून येणे भाग पडलेले चाहते नखशिखांत भिजले होते, त्यांचे कपडे चिखलाने खराब झाले होते. त्यातच मैदान पूर्ण आच्छादित नसल्यामुळे चाहते संतापले होते. मात्र त्यांनी रागावर नियंत्रण ठेवले. सुपर सॉपर मैदानात काम करीत असताना अचानक पाऊस थांबला, लोकांनी जोरदार आरोळी दिली; पण काही वेळातच त्यांना यापूर्वीच लढत रद्द झाली असल्याचे कळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indru Naag,did not blessed HPCA