INDvBAN : हिटमॅनच्या 'महा'वादळापुढे बांगलादेश भुईसपाट; मालिका 1-1 बरोबरीत!

Rohit-Sharma-IND
Rohit-Sharma-IND

राजकोट : येणार होते 'महा'चक्रीवादळ, मात्र धडकले रोहित शर्माचे महावादळ यात बांगलादेश क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले. भारताने मालिकेतला दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेट आणि 27 चेंडू राखून सहज जिंकून मालिकेत बरोबरी साधली. नवी दिल्लीतील पराभवाने शेपटीवर पाय पडलेल्या रोहितने आपल्या शंभराव्या सामन्यात 43 चेंडूत 85 धावांची तडाखेबंद खेळी केली. आता येत्या रविवारी (ता.24) नागपूरमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होईल. 

गुजरातकडे येणारे महा चक्रीवादळ राककोटमध्ये येता येता क्षीण झाले पण रोहित शर्माच बॅट मात्र अतिशय तीव्रतेने प्रहार करत होती. सहा चौकार सहा षटकारांची महाबरसात करत त्याने 85 धावा कुटल्या त्यामुळे 154 धावांचे आव्हानाचा पालापाचोळा कधी झाला हे बांगलादेशलाही कळले नाही. रोहित शर्माचा हा शंभरावा ट्‌वेन्टी -20 सामना होता. यात शतक करून शतकमहोत्सवी आनंद साजरा करण्याची संधी मात्र थोडक्‍यात हुकली. 

दिल्लीतील पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर रोहित लगेचच बाद झाला होता आज मात्र त्याची सव्याज परतफेड करण्याचे संकेत त्याची देहबोलीच देत होती. हुकमी पूलचा पहिला चौकार मारल्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकार, षटकारांचा जणू काही पाऊसच सुरु झाला. मुश्‍तफिजुरच्या एका षटकांत दोन चौकार आणि एक टोलेजंग षटकार मारून रोहितने महावादळाचे संकेत दिले. त्यानंतर मोठ्या फटक्‍यांचा ओघ त्याच्या बॅटमधून वाहतच होता. मोसादेक हुसैनला मारलेले सलग तीन षटकार बांगलादेशच्या खेळाडूंना सळो की पळो करणारे होते. 

पंतची अनाकलनीय चूक 

तत्पूर्वी, सामना सुरु झाल्यावर बांगलादेशची सलामीची जोडी फोडण्याची मिळालेली संधी रिषभ पंतने अनपेक्षित चुकीने वाया घालवली. 

युझवेंद्र चहलच्या चेंडूवर दास चकला. पंतने त्याला यष्टिचीतही केले; पण त्याने चेंडू यष्टींच्या पुढे पकडल्यामुळे तो नाबाद तर ठरलाच; परंतु तो नोबॉल ठरवण्यात आला. या संधीचा फायदा घेत त्याने चौकार मारला. पुढच्या चेंडूलाही हीच दिशा दाखवली. 
दुष्काळात तेरावा महिना म्हणजे दासने उंच मारलेला फटका झेलण्यासाठी तिघे खेळाडू धावले. अखेर रोहितच्या हातून झेल सुटला. अखेर दास पंतच्या चपळाईमुळे धावचीत झाला; त्याने 29 धावा केल्या. पण, याच पंतने यष्टीरक्षणात चूक केली तेव्हा तो 15 धावांवर होता. 

पुन्हा चूक टळली 

बांगलादेशचा दुसरा सलामीवीर नईमला वॉशिंग्टन सुंदरने बाद केल्यावर चहलच्या एका षटकात मुशफिकर रहीम आणि सौम्या सरकार बाद झाले. सौम्याला पंतने यष्टिचीत केले. यावेळीही तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. पंतने या वेळी चेंडू यष्टींच्या अगोदर पकडला, अन्यथा सौम्याही नाबाद ठरला असता. 

संक्षिप्त धावफलक :

बांगलादेश : 20 षटकांत 6 बाद 153 (लिटॉन दास 29 -21 चेंडू, 4 चौकार, मोहम्मद नईम 36 -31 चेंडू, 5 चौकार, सौम्या सरकार 30 -20 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मोहम्मदुल्ला 30 -21 चेंडू, 4 चौकार, दीपक चहर 25-1, वॉशिंग्टन सुंदर 25-1, युझवेंद्र चहल 28-2) पराभूत वि. भारत 15. 4 षटकांत षटकांत 2 बाद 154 (रोहित शर्मा 85 -43 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार, शिखर धवन 31 -27 चेंडू, 4 चौकार, श्रेयस अय्यर नाबाद 23 -12 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, अमिनुल इस्लाम 29-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com