
ऑकलंडच्या ईडन पार्कच्या तुलनेत हॅमिल्टन शहरातील सेडन पार्क वेगळे मैदान आहे. सीमारेषा फार मोठ्या नसल्या तरी मैदान गोल आहे. सेडन पार्कची खेळपट्टीही फलंदाजांना पोषक असेल. फरक इतकाच असेल की मैदान चारही बाजूंनी मोकळे असल्याने वारा चालू झाला तर त्याचा परिणाम गोलंदाजी करताना जाणवू शकतो.
हॅमिल्टन : पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने दिमाखात जिंकल्याने दडपणाचे ओझे संपूर्णपणे यजमान संघावर उतरले आहे. हॅमिल्टनच्या टी-20 सामन्यात उतरताना दोन्ही संघ फक्त आणि फक्त विजयाचा विचार करतील पण त्यात मोठा फरक आहे. भारतीय संघ हॅमिल्टन सामना जिंकून मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेण्याच्या मनसुब्याने सेडन पार्कवर उतरतील तर यजमान न्यूझीलंड संघ तिसर्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखण्याकरता धडपडतील.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ऑकलंडच्या ईडन पार्कच्या तुलनेत हॅमिल्टन शहरातील सेडन पार्क वेगळे मैदान आहे. सीमारेषा फार मोठ्या नसल्या तरी मैदान गोल आहे. सेडन पार्कची खेळपट्टीही फलंदाजांना पोषक असेल. फरक इतकाच असेल की मैदान चारही बाजूंनी मोकळे असल्याने वारा चालू झाला तर त्याचा परिणाम गोलंदाजी करताना जाणवू शकतो.
तिसर्या सामन्याबद्दल बोलताना वेगवान गोलंदाज टीम साउदी म्हणाला, ‘‘मान्य आहे की पहिल्या दोन सामन्यातील पराभवाने आम्ही मालिकेत मागे पडलो आहोत. पहिला सामना आम्ही जिंकायला हवा होता. श्रेयस अय्यरने दडपणाखाली फारच सुंदर फलंदाजी केल्याने भारताला सामना जिंकता आला. दुसर्या सामन्यात सगळ्या गोष्टी चुकत गेल्या. आमचा संघ नक्कीच पुनरागमन करू शकतो कारण तशी क्षमता आमच्या खेळाडूंच्यात आहे. संघात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंकरता मोठी संधी आहे आपला ठसा उमटवण्याची. एक खरे आहे की भारतीय संघाचा खेळ सतत सुधारत आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करायचे झाल्यास कमीतकमी चुका करून खेळात लक्षणीय सुधारणेची गरज आहे. ती आम्ही तिसर्या सामन्यात करू’’, शांत स्वभावाचा टीम साउदी विश्वासाने म्हणाला.
भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीची स्तुती केली. ‘‘संघ फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मावर अवलंबून नाही. गेल्या दोन सामन्यात के एल राहुल आणि श्रेयस अय्यरने केलेली फलंदाजी भन्नाट होती. ते दोघे मॅच विनर्स आहेत या बाब कोणाच्याच मनात शंका नव्हती. मला एक गोष्ट जाणवली आहे की भारतीय खेळाडू इतके क्रिकेट खेळत आहेत की कसोटी सामने आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात बरोबर बदल करतात. अगदी थोडे मार्गदर्शन करावे लागते. कसोटी क्रिकेटमधे मोठे फटके आता सहजी मारले जायला लागले आहेत. आणि मोठे फटके मारताना ताज्या दमाच्या खेळाडूंचे तंदुरुस्ती ताकद आणि मानसिक क्षमता सगळेच वाढले आहे हे मान्य करावे लागेल’’, विक्रम राठोड म्हणाले.
भारतीय संघातील विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, महंमद शमी, जसप्रीत बुमरा आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंनी सरावाला हजेरी लावली नाही. बाकीच्या खेळाडूंनी सकाळी 10 ते 12 चांगला दोन तास सरावर करून सेडन पार्कच्या सराव सुविधांवर घाम गाळला. न्युझिलंडचा संपूर्ण संघ दुपारनंतर सरावाला हजर झाला. प्रशिक्षक गोलंदाजांना कोणत्या टप्प्यावर मारा करायला पाहिजे याच्या सूचना देताना दिसले. सामना कामाच्या वारी असला तरी कामाच्या वेळा संपल्यावर असल्याने सेडन पार्कवर प्रेक्षकांची गर्दी होण्याची शक्यता वाटते आहे. किमान स्थानिक अनिवासी भारतीयांमधे तो उत्साह नक्कीच दिसतो आहे. सामना स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बाराला चालू होईल.