जखमी प्रवीण राणाची निवड चाचणीतून माघारच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

प्रवीण राणाचा खांदा दुखावल्यानंतरही सुशील कुमारसाठी जागतिक कुस्ती स्पर्धेची चाचणी सोपी नसेल. प्रवीण राणा नसला तरी अमित धनकर सुशीलची गणिते बिघडवू शकेल असे मानले जात आहे.

मुंबई : प्रवीण राणाचा खांदा दुखावल्यानंतरही सुशील कुमारसाठी जागतिक कुस्ती स्पर्धेची चाचणी सोपी नसेल. प्रवीण राणा नसला तरी अमित धनकर सुशीलची गणिते बिघडवू शकेल असे मानले जात आहे.

गेल्या महिन्यात जागतिक कुस्तीची फ्रीस्टाईल चाचणी झाली होती. त्या वेळी या गटातील कुस्तीगीर जखमी असल्याने चाचणी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही चाचणी 17 किंवा 18 ऑगस्टला होईल, असे संकेत भारतीय कुस्ती पदाधिकारी देत आहेत.

दोनदा ऑलिंपिक जिंकलेला, पण रिओ ऑलिंपिकसाठी पात्र न ठरलेला सुशील कुमार टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. जागतिक कुस्तीद्वारे ऑलिंपिक पात्रता मिळवण्याचे त्याचे लक्ष्य आहे. त्याला चाचणीत जिचेंद्र किन्हा आणि अमित धनकर हे आव्हान देण्याची शक्‍यता आहे.

प्रवीणने आशियाई कुस्ती स्पर्धेत 79 किलो गटात पदक जिंकले होते, पण तो जागतिक स्पर्धेसाठी 74 किलो गटात खेळणार होता. एका स्पर्धेत माझा खांदा दुखावला होता. तो अजूनही बरा झालेला नाही. डॉक्‍टरांनी सराव करण्यासही मनाई केली आहे, असे प्रवीणने सांगितले.

प्रवीण नसला तरी अमित धनकर सुशीलची गणिते बिघडवू शकेल. त्याने आशियाई स्पर्धेत 74 किलो गटात पदक जिंकले होते. त्याच वेळी सुशील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अपयशी ठरला आहे, याकडे कुस्ती अभ्यासक लक्ष वेधत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: injured praveen rana withdrew from selection trial