साईना अद्यापही दुखापतीने बेजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

जागतिक स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच त्या स्पर्धेच्यावेळी दुखापतीचा कोणताही प्रश्‍न असू नये, यासाठी साईना नेहवालने इंडोनेशिया ओपनपाठोपाठ जपान ओपनमधूनही माघार घेतली आहे. 
 

मुंबई ः जागतिक स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच त्या स्पर्धेच्यावेळी दुखापतीचा कोणताही प्रश्‍न असू नये, यासाठी साईना नेहवालने इंडोनेशिया ओपनपाठोपाठ जपान ओपनमधूनही माघार घेतली आहे. 

साईनाच्या अनेक दुखापतींवर उपचार सुरू आहेत, तर काहीतून ती सावरली आहे. तिने माफक सराव सुरू केला आहे. तिने जागतिक स्पर्धेवरच आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

यंदा साईनानेच केवळ अव्वल स्पर्धेत विजेतेपद जिंकले आहे. तिने स्वीस ओपनमध्ये ही कामगिरी केली होती. ऑल इंग्लंड स्पर्धेनंतर साईनावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ती तंदुरुस्त होऊन एप्रिलमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी तयार झाली. मात्र, काही दिवसांच्या अंतराने तिचा घोटा आणि मनगट दुखावले. त्याचा तिच्या सरावावर परिणाम झाला. इंडोनेशिया ओपन सहभागासाठी साईना खूपच आतूर होती. तिने ही स्पर्धा तीनदा जिंकली आहे. 

साई प्रणीतची विजयी सलामी 
साई प्रणीतने जपान ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने पहिल्या फेरीत जपानच्या केंतो निशिमोतो याला 21-17, 21-13 असे हरवले. इंडोनेशिया स्पर्धेत प्रणीत अपयशी ठरला होता. 

गतवर्षी दुखापतीमुळे प्रणीतने या स्पर्धेतून माघार घेतली होती. पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतच्या सलामीच्या लढती बुधवारी होतील. 

दरम्यान, मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज यांनी मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी लिंडा एफ्लर - मार्विन सेईदेल यांचा 21-14, 21-19 असा पाडाव केला. 

मनू अत्री - बी. सुमित रेड्डी यांना पुरुष दुहेरीत सलामीलाच हार पत्करावी लागली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: injured Saina withdrawn from japan open to concentrate on world championship