नाबाद ५०८ धावा! वनडे क्रिकेट सामन्यात नागपूरच्या यशचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inter-school cricket tournament Yash Chawde 508 not out nagpur sport

नाबाद ५०८ धावा! वनडे क्रिकेट सामन्यात नागपूरच्या यशचा विक्रम

नागपूर : सरस्वती विद्यालयाचा क्रिकेटपटू यश चावडेने शुक्रवारी मुंबई पलटनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश्वर विद्यालयाविरुद्ध खेळताना नाबाद पाचशे धावा ठोकण्याचा अनोखा पराक्रम केला.

त्याचा धावांचा पतंग शुक्रवारी गगनावर गेला. इतक्या धावा काढणारा यश विदर्भातील पहिलाच फलंदाज आहे. झुलेलाल कॉलेजच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सरस्वती विद्यालयाने निर्धारित ४० षटकांत एकही गडी न गमावता ७१४ धावा फटकावल्या.

यात एकट्या यशचा नाबाद ५०८ धावांचा वाटा होता. डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोर्ट्स अकादमीत सराव करणाऱ्या सलामीवीर यशने ८१ चौकार व १८ षटकारांच्या मदतीने केवळ १७८ चेंडूंत या धावा काढल्या. १४ वर्षांच्या यशने सिद्धेश्वर विद्यालयाच्या गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली. विदर्भात कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत काढलेल्या या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत.

शालेय स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मुंबईच्या प्रणव धनावडेच्या नावावर आहे. त्याने १००९ धावा काढल्या होत्या. या सामन्यात यशचा सलामी जोडीदार तिलक वाकोडेनेही नाबाद शतक झळकावले. त्याने १३ चौकारांसह ९७ चेंडूंत नाबाद १२७ धावा केल्या.

यश चावडेचा विक्रमी धावांचा पतंग गगनावरी

या पहाडाएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सिद्धेश्वर विद्यालयाचा संघ ५ षटकांत केवळ नऊ धावांतच गारद झाला. सरस्वती विद्यालयाने हा सामना ७०५ धावांच्या विशाल फरकाने जिंकला. यशच्या भीमपराक्रमाची आज क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा होती. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भाचे रणजीपटू फैज फजल, अक्षय वाडकर व अक्षय कोल्हार सरस्वती विद्यालयाचेच विद्यार्थी व खेळाडू आहेत.