संजीताप्रकरणी "आयडब्ल्यूएफ'चा माफीनामा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

मी दोषी नाही याचा मला विश्‍वास होता. या सगळ्या लढ्यात भारतीय वेटलिफ्टिंग महासंघ आणि क्रीडा मंत्रालय पाठिशी उभे राहिले, त्यामुळे लढण्यास बळकटी मिळाली. मी सर्वांची आभारी आहे. अशा प्रकरणाने एखाद्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पणाला लागत असते. त्यामुळे अशा प्रकरणात आंतरराष्ट्रीय महासंघाकडून अशी चूक होतेच कशी, हा खरंच संशोधनाचा भाग आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशीची मागणी केली आहे. - संजीता चानू, भारतीय वेटलिफ्टर 

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताची सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर झालेल्या डोपिंगच्या आरोपाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला यश आले आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने प्रशासकीय चुकीमुळेच संजीताचे नाव डोपिंगमध्ये गोवले केल्याचे कबूल करताना झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर संजीता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने दिला होता. या प्रकरणाची माहिती संजीताला देताना झालेल्या संपर्कात उत्तेजक सापडलेल्या नमुन्याचे दोन वेगळे क्रमांक देण्यात आले होते. संजीताकडून गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या नमुन्याचा क्रमांक 1599000 असा होता. मात्र, ज्या नमुन्यात उत्तेजक सापडले त्याचा क्रमांक 1599176 असा होता. संजीता आणि भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने ही गोष्ट निदर्शनास आल्यावर पंतप्रधानांना या प्रकरणात संजीताला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने क्रीडा मंत्रालयाला यात लक्ष घालण्यास सांगितले आणि त्यांनी "नाडा'ला पुढील कारवाई करण्यास आणि सत्यता पडताळण्यास सांगितले. 

या प्रकरणात आपण दोषी नसल्याची संजीताला खात्री होती. तिने केवळ पत्रातील चूकच दाखवून तसा दावा केला नाही, तर उत्तेजक आढळलेला नमुना आपला नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ती "डीएनए' टेस्टही देण्यास तयार होती. "नाडा'ने हे सर्व प्रकरण आंतरराष्ट्रीय संघटनेसमोर ठेवले. आंतरराष्ट्रीय महासंघाने याची पडताळणी केली असता संजीता आणि भारतीय संघटनेने केलेला दावा खरा ठरला. प्रशासरकीय चुकीमुळे हे झाल्याचे त्यांनी मान्य करून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. 

या कलाटणीनंतर संजीताचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे. संजीताने याबाबत समाधान व्यक्त केले असले, तरी आता तिने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय महासंघाकडे केली आहे. 

मी दोषी नाही याचा मला विश्‍वास होता. या सगळ्या लढ्यात भारतीय वेटलिफ्टिंग महासंघ आणि क्रीडा मंत्रालय पाठिशी उभे राहिले, त्यामुळे लढण्यास बळकटी मिळाली. मी सर्वांची आभारी आहे. अशा प्रकरणाने एखाद्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पणाला लागत असते. त्यामुळे अशा प्रकरणात आंतरराष्ट्रीय महासंघाकडून अशी चूक होतेच कशी, हा खरंच संशोधनाचा भाग आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशीची मागणी केली आहे. - संजीता चानू, भारतीय वेटलिफ्टर 

Web Title: International body admits administrative mistake in Sanjita chanu dope case