भारत-पाकिस्तान लढती न झाल्यास फटका बसेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

कराची - पाकिस्तानचा सहभाग असलेल्या कोणत्याही निमंत्रित आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत न खेळण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी भारताने केल्यामुळे पाक हॉकी महासंघ हादरला आहे. भारत-पाकच्या लढती न झाल्यास त्याचा जागतिक हॉकीला फटका बसेल, असे तुणतुणे वाजवण्यास पाक हॉकी पदाधिकाऱ्यांनी सुरवात केली आहे.

कराची - पाकिस्तानचा सहभाग असलेल्या कोणत्याही निमंत्रित आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत न खेळण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी भारताने केल्यामुळे पाक हॉकी महासंघ हादरला आहे. भारत-पाकच्या लढती न झाल्यास त्याचा जागतिक हॉकीला फटका बसेल, असे तुणतुणे वाजवण्यास पाक हॉकी पदाधिकाऱ्यांनी सुरवात केली आहे.

तीन वर्षांच्या चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतास पराजित केल्यावर पाक हॉकीपटूंनी आक्षेपार्ह हावभाव केले होते. एवढेच नव्हे, तर भारतातील विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेसाठी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया पाकने वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घेतला. पाकने यासाठी हॉकी इंडियाला जबाबदार धरले. यामुळे भविष्यात पाकचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत न खेळण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. 

भारताच्या या निर्णयामुळे सुलतान अझलन शाह स्पर्धा संयोजकांनी पाकिस्तानला स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले. आता मलेशियातील सुलतान जोहर कप या कुमार स्पर्धेत पाकिस्तान असल्यामुळे भारत खेळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताच्या या निर्णयाचे पाक हॉकी प्रगतीवर दूरगामी परिणाम होतील, याची धास्ती त्यांना वाटत आहे. 

भारतीय हॉकी पदाधिकारी सारासार विचार करतील. पाकिस्तानवरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतील, कारण यामुळे जागतिक हॉकीचेच नुकसान होणार आहे, असे पाक हॉकी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले; पण त्यांना आपली पीछेहाट झाल्याची लगेच जाणीवही झाली. पाकिस्तान जागतिक हॉकीत आता ताकद नाही. आमचे मानांकनही घसरले आहे. त्यामुळेच आम्हाला ही वागणूक मिळत आहे. हॉकी लोकप्रिय करण्यात पाकिस्तानने केलेल्या कामगिरीचा विसर पडत आहे.  

हॉकी इंडिया अन्याय करत आहे. ते पाकिस्तान हॉकीचे नुकसान करत आहेत; मात्र याचा फटका जागतिक हॉकीला बसेल. आशियाई हॉकी महासंघाने आता यात मध्यस्थी करायला हवी.
- इस्लाउद्दीन सिद्दिकी, पाकचे माजी कर्णधार

चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील कृत्याबद्दल माफी मागितली होती. आमच्या खेळाडूंना शिक्षाही झाली होती. त्यांना आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे.
- शहनाझ शेख, पाकचे माजी मार्गदर्शक (२०१४ च्या स्पर्धेच्यावेळी हेच पाकचे मार्गदर्शक होते)

Web Title: International hockey