मुंबई क्रिकेटच्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच राहिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे 39 खेळाडू मतदार झाले असले तरी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विजय पाटील यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच राहिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे 39 खेळाडू मतदार झाले असले तरी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विजय पाटील यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

लोढा समितीने माजी क्रिकेटपटूंना मतदार करून घेण्याची सूचना केली. अर्थात यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा वेळ नसतानाही 39 खेळाडू मतदार झाले. पुरेसा वेळ असता, त्याची माहिती मिळाली असती तर यापेक्षा जास्त खेळाडू मतदार झाले असते, असे सांगितले जात आहे. अर्थात सध्या तरी या निवडणुकीत कोणीही आंतरराष्ट्रीय खेळाडू नसल्याचे संकेत मिळत आहेत.

अनेक खेळाडूंच्या अकादमी आहेत किंवा ते संघांचे मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. त्यांची उमेदवारी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे रद्द होण्याचा धोका होता, त्यामुळेच ते या निवडणुकीत नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महाडदळकर गटाच्याविरोधात युनायटेड फॉर चेंज गट उतरला आहे. त्यांनी अपेक्षेनुसार विजय पाटील यांना अध्यक्षपदास पाठिंबा दिला आहे. मूळच्या क्रिकेट फर्स्ट गटातील काहीच सदस्य या गटाचे उमेदवार आहेत. दरम्यान, गतनिवडणुकीत सचिव म्हणून निवडून आलेले डॉ. उन्मेश खानविलकर कार्यकारिणी सदस्य पदासाठी निवडणूक लढवतील.

अमोल काळेही बिनविरोध
महाडदळकर गटाने अमोल काळे हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. तेच आपलेही उमेदवार असल्याचे प्रतिस्पर्धी गटाने जाहीर केले. काळेंचा जन्म नागपूरचा आहे, पण ते मुंबईत काम करतात. त्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे, पण काळेंनी ते फेटाळल्याचे वृत्त आहे.

महत्त्वाच्या पदाची अपेक्षित निवडणूक - सचिव ः संजय नाईक (महाडदळकर गट) वि. नदीम मेमन (युनायटेड फॉर चेंज). सहसचिव ः शाह आलम शेख (महाडदळकर गट) वि. संगम लाड (युनायटेड फॉर चेंज). खजिनदार ः जगदीश आचरेकर (महाडदळकर गट) वि. मयांक खांडवाला (युनायटेड फॉर चेंज).

-----------
मुंबई क्रिकेट संघटनेच्या सदस्यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. सर्वांनीच माझ्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. पुन्हा या संघटनेत येत असल्याचा खूप आनंद आहे. अर्थातच माझ्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. मुंबई क्रिकेटच्या विकासाला हातभार लावेन असा विश्वास वाटत आहे.
- डॉ. विजय पाटील, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: international players stay away from mumbai cricket election