"आयओए'च्या पदाधिकाऱ्यांची "सीबीआय' चौकशी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

गेल्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिंपिकसाठी "आयओए'ने डॉ. पवनदीप सिंग आणि आर. एस. नेगी यांची पात्रता आणि पुरेसा अनुभव नसताना भारताच्या ऑलिंपिक पथकात निवड केली होती. याच प्रकरणात "सीबीआय'ने चौकशीस सुरवात केली आहे. या संदर्भात "आयओए'ला खुलासा करावा लागणार आहे.

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी वैद्यकीय अधिकारी पाठवताना भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) पदाधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार आणि वशिलेबाजी झाल्याच्या आरोपप्रकरणी "सीबीआय' ऑलिंपिक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या चौकशीस सुरवात केल्याचे वृत्त आहे.

रियो ऑलिंपिकसाठी "आयओए'च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड करताना वशिलेबाजी करून आपल्या नातलगांचीच निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणाची चौकशी "सीबीआय'ने सुरू केली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिंपिकसाठी "आयओए'ने डॉ. पवनदीप सिंग आणि आर. एस. नेगी यांची पात्रता आणि पुरेसा अनुभव नसताना भारताच्या ऑलिंपिक पथकात निवड केली होती. याच प्रकरणात "सीबीआय'ने चौकशीस सुरवात केली आहे. या संदर्भात "आयओए'ला खुलासा करावा लागणार आहे. पवनदीप हे "आयओए' उपाध्यक्ष त्रलोचनसिंग यांचे चिरंजीव असून, नेगी हे सचिव राजीव मेहता यांचे निकटवर्तीय मानले जातात.

वैद्यकीय पथकाचे अपयश
भारतीय संघासोबत पाठविण्यात आलेले हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे "रेडिओलॉजिस्ट' म्हणून काम करतात. त्यांना क्रीडा वैद्यकशास्त्राची पुरेशी माहिती नाही. अशा वेळी स्पर्धे दरम्यान जे घडायचे तेच घडले होते. ऑलिंपिक स्पर्धेला सुरवात झाल्यावर खेळाडूंबरोबरच त्यांच्यासोबत असणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या अकार्यक्षमतेविषयी देखील जोरदार चर्चा होती. स्पर्धेदरम्यान धावपटू ओपी जैशा, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल, हॉकीपटू एस. व्ही. सुनील, महिला कुस्तीगीर विनेश फोगट असे प्रमुख खेळाडू जखमी झाले. त्यांच्या दुखापतीविषयी नेमका अहवालही सादर करण्यात आला नाही. स्पर्धेच्या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या दुखापतीच्या तक्रारी आल्यावर पवनदीप यांनी प्रत्येकवेळेस "कॉंबीफ्लाम' ही वेदनाशामक गोळी दिल्याची तक्रार काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्या वेळी केली होती.

या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर त्रलोचनसिंग यांनी आपल्या मुलाची पाठराखण करण्यास सुरवात केली होती. "पवनदीप "आयओए'च्या वैद्यकीय समितीचे प्रमुख आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वैद्यकीय समितीचे सदस्य आहेत. ते एक चांगले डॉक्‍टर आहेत,' असा खुलासा त्यांनी त्या वेळी केला होता.
दरम्यान, या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षिण आशियाई स्पर्धेतही हीच जबाबदारी पार पाडल्यामुळे त्यांची ऑलिंपिकसाठी निवड करण्यात आली असे "आयओए'चे म्हणणे आहे. मात्र, ही माहिती "आयओए'च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

Web Title: IOA officers interrogated by CBI