विराट कोहलीचा बंगळूर ‘आउट’

rahul-tripathi
rahul-tripathi

जयपूर - स्वत- विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स असे दादा फलंदाज असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आव्हान यंदाच्या आयपीएलमधून संपुष्टात आले. अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा तब्बल ३० धावांनी पराभव केला. पहिला आयपीएल सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्‍लासेन आणि लेगस्पिनर श्रेयस गोपाल हे राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

गेल्या काही सामन्यांत राजस्थानला अफलातून विजय मिळवून देणारा ज्योस बटलर आणि त्याचा सहकारी बेन स्टोक्‍स इंग्लंडला परतले तरीही राजस्थानची ताकद कमी झाली नाही. बटलरऐवजी संधी मिळालेल्या क्‍लासेनने फलंदाजीत ३२ आणि चार यष्टिचीत केले. तसेच श्रेयस गोपालने १६ धावांत चार विकेट मिळवले. यामध्ये एबी डिव्हिलियर्सच्या महत्त्वपूर्ण विकेटचा समावेश आहे.

बटलर संघात नसतानाही राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. या सर्वसाधारण धावसंख्येचे त्यांनी संरक्षण केले. या आव्हानासमोर बंगळूरने १ बाद ७५ अशी सुरवात केली होती. त्या वेळी शंभरपेक्षा कमी धावांची गरज होती; परंतु त्यानंतर त्यांचा डाव घसरत गेला. सामन्यानंतर विराटने हीच खंत बोलून दाखवली.

विराट किंवा डिव्हिलियर्स खेळपट्टीवर उभे राहतात त्या वेळी बंगळूरची धावसंख्या मोठी झालेली असते; परंतु ते बाद होतात तेव्हा त्यांच्या इतर फलंदाजांचा दुबळेपणा जाहीर होतो. कर्नाटकचा आणखी एक लेगस्पिनर गौतमने विराटला तिसऱ्याच षटकात बाद केले. त्यानंतर डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांनी डाव सावरला होता; पण गोपालने एकाच षटकात पार्थिव आणि मोईन यांना बाद करून धक्कादायक निकालाची नांदी केली. 

डिव्हिलियर्स मैदानात असेपर्यंत बंगळूरच्या आशा जिवंत होत्या; परंतु गोपालने त्याला गुगलीवर चकवले तेथेच सामन्याचा निकाल जवळपास निश्‍चित झाला होता.

त्या अगोदर राहुल त्रिपाठी राजस्थानच्या फलंदाजीचा हिरो ठरला. सलामीला खेळताना त्याने नाबाद राहत ८० धावांची खेळी केली. त्याला सुरवातीला अजिंक्‍य रहाणे आणि डावाच्या अखेरीस क्‍लासेनने चांगली साथ दिली. 

संक्षिप्त धावफलक 
राजस्थान - २० षटकांत ५ बाद १६४ (राहुल त्रिपाठी नाबाद ८०-५८ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, अजिंक्‍य रहाणे ३३-३१ चेंडू, ३ चौकार, क्‍लासेन ३२-२१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, उमेश यादव २५-३) वि. वि. बंगळूर - १९.२ षटकांत सर्वबाद १३४ (विराट कोहली ४, पार्थिव पटेल ३३-२१ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, एबी डिव्हिलियर्स ५३-३५ चेंडू, ७ चौकार, लुगहिल्न १५-२, उनाडकट २७-२, श्रेयस गोपाल १६-४)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com