esakal | IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्ज उद्घाटनाच्या सामन्याला मुकणार; कोरोनामुळे संघाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

ms dhoni

कोरोनामुळे यंदाचा आयपीएल हंगाम युएईमध्ये होत आहे. मात्र कोरोनाचं संकट टळलेलं नाही. चेन्नई सुपरकिंग्जमधील 2 खेळाडूंसह 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआय़ने दिली आहे.

IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्ज उद्घाटनाच्या सामन्याला मुकणार; कोरोनामुळे संघाला फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनामुळे यंदाचा आयपीएल हंगाम युएईमध्ये होत आहे. मात्र कोरोनाचं संकट टळलेलं नाही. चेन्नई सुपरकिंग्जमधील 2 खेळाडूंसह 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआय़ने दिली आहे. चेन्नईला एका पाठोपाठ एक धक्के बसले आहेत. सुरुवातीला दीपक चाहरला कोरोना लागण झाल्यानंतर सर्व खेळाडू क्वारंटाइन झाले. त्यानंतर संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैना त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. तो आता संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.

दीपक चाहरनंतर ऋतुराज गायकवाडला कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे संघाला क्वारंटाइनमध्ये रहावं लागत आहे. याचा परिणाम संघाच्या सरावावर होत असून यंदाच्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना चेन्नई खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय़च्या आधीच्या शेड्युलनुसार चारवेळा विजेत्या मुंबई इंडियन्सची लढत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या तीन वेळा आयपीएल विजेत्या आणि सर्वाधिक वेळा अंतिम सामना खेळलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होणार होता.

हे वाचा - IPL 2020 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे गडी अडकले कोरोनाच्या जाळ्यात

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ट्विटरवर म्हटलं होतं की, उद्घाटनाचा सामना 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. आता पुन्हा सामन्यांचे वेळापत्रक शनिवारी किंवा रविवारी घोषित होणे अपेक्षित होते. मात्र आता चेन्नईच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं त्याला विलंब होत आहे. म्हणजेच वेळापत्रकात थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, बीसीसीआयने सीएसकेमध्ये सध्या कोरोनामुळे असलेली परिस्थिती सावरण्यासाठी त्यांना आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं वृत्त इनसाइड स्पोर्टने दिलं आहे. चेन्नईचा संघ आणखी सहा दिवस क्वारंटाइन राहणार आहे. तोपर्यंत त्यांना सराव करता येणार नाही. क्वारंटाइन संपल्यानंतर पुन्हा सर्वांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट येणंही महत्वाचं असणार आहे. 

हे वाचा - IPL 2020: CSK ला आणखी एक धक्का, धोनीची साथ सोडून रैना मायदेशी परतला

बीसीसीआय़च्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, चेन्नई आयपीएलचा उद्घाटनाचा सामना खेळण्याच्या स्थितीत नाही. चेन्नईला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येऊन स्थिर होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. चेन्नई सुपर किंग्जची टीम युएईला जाण्याआधी चेपॉकमध्ये पाच दिवस थांबली होती. युएईला पोहोचल्यापासून संपूर्ण संघ रूममध्ये क्वारंटाइन झाला आहे.