आयपीएल दोन टप्प्यात? लवकरच जाहीर होणार वेळापत्रक? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कोविड चाचणी करणे आवश्‍यक आहे आणि ती निगेटिव्ह आलीच तरच सीमा पार करता येणार आहे.

नवी दिल्ली - आयपीएल आता अवघ्या २० दिवसांवर आली तरी वेळापत्रक तयार झालेले नाही. दुबई आणि अबु धाबी या दोन शहरांतील कोरोना चाचणी आणि विलगीकरण वेगवेगळे नियम असल्याने दोन टप्प्यांत आयपीएल वेळापत्रक तयार करण्याचा सुवर्णमध्य बीसीसीआयला काढावा लागणार असून आयपीएलचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

१९ सप्टेंबरपासून सुरू होणारी ६० दिवसांच्या आयपीएलचे सामने दुबई, शारजा आणि अबु धाबी या तीन शहरांत होण्याचे निश्‍चित झाले आहे, त्यानुसार सर्व संघही दुबई आणि अबु धाबी शहरांत दाखल झाले आहेत; परंतु या दोन शहरांमध्ये कोरोना संदर्भातील नियम वेगवेगळे आहेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कोविड चाचणी करणे आवश्‍यक आहे आणि ती निगेटिव्ह आलीच तरच सीमा पार करता येणार आहे.

पहिला टप्पा दुबई-शारजात?
दोन शहरांतील प्रवास कमी करण्यासाठी ५६ साखळी सामने दोन टप्प्यात खेळवण्याचा विचार सुरू आहे. दुबईत (२१ सामने), अबु धाबीत (२१) आणि शारजात (१४) सामने अशी विभागणी होऊ शकते. दुबई-शारजा-अबु धाबी अशी शहरांची रचना आहे आणि सध्या दुबई-शारजामध्ये कोणतेही प्रवास बंधने नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्पा दुबई-शारजात खेळवला जाण्याची शक्‍यता आहे. दुसरा टप्पा अबु धाबीत होऊ शकेल.

दोन दिवसांत अंतिम निर्णय?
बीसीसीआयची टीम अमिरातीत दाखल झालेली आहे आणि ते अमिराती सरकार तसेच अमिराती क्रिकेट मंडळाशी चर्चा करत आहे. आयपीएल कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि हेमांग अमिन अमिराती सरकारच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई, कोलकताचे अतिरिक्त विलगीकरण?
आयपीएलचे आठही संघ अमिरातीत दाखल झालेले 
आहेत. यातील सहा संघ दुबईत आहेत; तर मुंबई 
इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्सचे संघ मात्र अबु धाबीतील हॉटेलमध्ये आहेत. प्रत्येक संघ सध्या सात दिवसांच्या विलगीकरणात आहेत. आयपीएलचा सुरुवातीचा टप्पा जर दुबईत खेळवण्याचा निर्णय झाला तर मुंबई आणि कोलकता संघाला अमिराती सोडायची असेल तर त्यांना १४ दिवसांचे विलगीकरण आवश्‍यक आहे, असा नियम त्यांनी केला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2020 Schedule to be Announced on Saturday