esakal | खांदे पालट झाली तरी 'सूर्योदय' नाहीच, राजस्थानचा 'रॉयल' विजय

बोलून बातमी शोधा

RRvsRR
खांदे पालट झाली तरी 'सूर्योदय' नाहीच, राजस्थानचा 'रॉयल' विजय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जोस बटलरच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने उभारलेला धावांचा डोंगर सर करण्यात सनरायझर्स हैदराबादला अपयश आले. 221 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावांपर्यंतच मजल मारु शकला. सलामीला आलेल्या मनिष पांड्येच्या 20 चेंडूतील 31 धावा आणि जॉनी बेयरस्टोने 21 चेंडूत केलेल्या 30 धावा ही हैदराबादच्या संघाकडून झालेली सर्वोच्च खेळी ठरली. परिणामी संघाला 55 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. खांदे पालट झाल्यानंतरही संघाला लागलेले पराभावाचे ग्रहण कायम असून सूर्यादयाची प्रतिक्षा कायम राहिली.

हेही वाचा: VIDEO भावा मानलं! पाणउतारा होऊन वॉर्नर पाणी द्यायला धावला

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी जयस्वालला राशीद खानने स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन 150 धावांची भागीदारी केली. विजय शंकरने 48 धावांवर खेळणाऱ्या संजूला माघारी धाडले. जोस बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार खेचले. संदीप शर्माने त्याची विकेट घेतली. या तिघांशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या कोणत्याही गोलंदाजाला नावाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या.

हेही वाचा: CSK विरुद्ध MI ने चिटिंग केली; हे मुंबईचं स्पिरीट का?

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मनिष पांड्ये आणि जॉनी बेयरस्टोने हैदराबादच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी झालेली अर्धशतकी भागीदारीने संघाला विश्वास निर्माण केला. मुस्तफिझूरने ही जोडी फोडत हैदराबादला बॅकफूटवर धाडले. राहुल तेवतियाने सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या जॉनी बेयरस्टोला बाद केले. त्याने 21 चेंडूत 30 धावा केल्या. केन विल्यमसन 20 (21), केदार जाधव 19 (19), मोहम्मद नबी 17 (5), अब्दुल समद 10 (8), भुवनेश्वर कुमार 14(10) आणि संदीप शर्मा 8 (6), राशीद खान शून्य तर विजय शंकर 8 धावा करुन माघारी फिरले. एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. मुस्तफिझूर रेहमानन आणि क्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी 3-3 तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागी यांना एक-एक विकेट मिळाली.