IPL 2023 : 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण! ८ संघातील १२ हून अधिक खेळाडू जखमी, RCB-CSK मधील सर्वाधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 more than 12 players are injured rcb csk are most affected teams indian premier league 2023

IPL 2023 : 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण! ८ संघातील १२ हून अधिक खेळाडू जखमी, RCB-CSK मधील सर्वाधिक

इंडियन प्रीमियर लीग (IPL 16) च्या 16व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे तीन दिवस बाकी आहेत, मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक स्टार क्रिकेटर्स दुखापतीमुळे लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीयेत.

या दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जॉनी बेअरस्टो, काइल जेम्सन, विल जॅक्स, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णासारखे क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लोकी फर्ग्युसन, मुकेश चौधरी सारखे क्रिकेटपटूंच्या सहभागाबद्दल देखील साशंकता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे क्रिकेटपटूंच्या दुखापतीने सर्वाधिक प्रभावित झालेले संघ आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेता गुजरात टायटन्स हे एकमेव संघ आहेत ज्यांना आतापर्यंत दुखापतींचा फटका बसलेला नाही.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यावेळी लीगवर दुखापतींचे सावट दिसत आहे. या दुखापतींमुळे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना त्यांचे कर्णधार बदलावे लागले. या हंगामात पंतच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आहे. त्याचबरोबर कोलकाताने श्रेयसच्या जागी नितीश राणाला कर्णधारपदी नियुक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्याच्या खेळाण्याबाबत साशंकता आहे. यामुळेच केकेआरने राणाला कर्णधार म्हणून निवडले आहे. कोलकाताकडून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनलाही दुखापतीमुळे स्पर्धेतील सुरूवातीचे सामने खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

आरसीबीसाठी गेल्या हंगामात 152.75 च्या स्ट्राइक रेटने 333 धावा करणारा रजत पाटीदार आणि त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्या सहभागाबद्दलही साशंकता आहे. पाटीदारवर टाचेच्या दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरू आहेत, तर हेझलवूड दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. गेल्या हंगामात सर्वात जलद शतक झळकावणारा पाटीदार दुखापतीतून सावरत असल्याचं म्हटलं जात आहे.

पण अर्ध्या स्पर्धेत तो बाहेर राहू शकतो. आरसीबीकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज विल जॅकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या मोसमात सीएसकेसाठी 13 सामन्यांत 16 विकेट घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी देखील एनसीएमध्ये पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. या हंगामात तो कधी उपलब्ध होईल हे निश्चित नाही. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन याची माघार हा सीएसकेसाठी मोठा धक्का आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मगालाला संधी देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरलेला जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाई रिचर्डसन हे दोघेही जखमी झाले आहेत. बुमराह न खेळणे हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा मुंबईसाठी दिलासादायक बाब आहे. आर्चर यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये खेळला होता.

गेल्यावेळी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यावेळी जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. लकनऊ सुपरजायंट्सला आशा आहे की मोहसिन त्यांच्यासाठी स्पर्धेच्या मध्ये उपलब्ध होईल. पंजाब किंग्जकडून गेल्या वेळी 253 धावा करणारा जॉनी बेअरस्टोही या लीगमध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी बिग बॅशमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला घेण्यात आले आहे.

दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा माजी गोलंदाज संदीप शर्माला संघात आणले आहे. पाठीच्या खालच्या दुखापतीतून कृष्णा अद्याप सावरलेला नाही. लीगमधील 104 सामन्यांत 114 बळी घेणारा संदीप शर्मा चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. त्याला त्याची बेस प्राइज 50 लाखांवर घेण्यात आले आहे. गेल्या 10 हंगामांपासून तो लीगमध्ये खेळत आहे.