
IPL : त्यात माझाही निर्णय चुकला...पंजाबच्या गब्बरने दिली पराभवाची कबुली
धरमशाला - अंतिम षटक फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार याला देण्याचा निर्णय अंगलट आला, अशी कबुली पंजाब किंग्स संघाचा कर्णधार शिखर धवनने दिली. दिल्ली संघाविरुद्धच्या या पराभवानंतर पंजाबचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१३ धावा केल्या. पंजाबने अखेरपर्यंत किल्ला लढवला; परंतु त्यांना ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांना १५ धावांच्या पराभवाचा सामना करावा लागला.
सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन षटकांत केवळ १६ धावा देणाऱ्या ब्रारच्या अखेरच्या षटकांत तब्बल २३ धावा फटकावल्या आल्या आणि याच धावा पंबाजच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. पंजाबकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अर्शदीप सिंगची दोन षटके शिल्लक होती, तरीही धवनने ब्रारवर विश्वास ठेवला.
पंजाब संघाचे वेगवान गोलंदाज फार चांगली कामगिरी करू शकले नव्हते, म्हणून धवनने फिरकी गोलंदाजाचा पर्याय निवडला. अखेरच्या पाचपैकी तीन षटके ब्रारने गोलंदाजी केली, तर दोन षटके वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने टाकली.
यातील १९ व्या षटकांत एलिसने १८; तर अंतिम षटकात ब्रारने २३ धावा दिल्या. पंजाबसाठी याच धावा पराभवास कारणीभूत ठरल्या. अखेरच्या दोन षटकांत या दोघांनी गोलंदाजी देण्याचा माझा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली धवनने सामना संपल्यानंतर दिली.