आयपीएल:रायझिंग पुणे सुपरजायंट्‌सपुढे 130 धावांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबईचा डावखुरा शैलीदार फलंदाज कृणाल पंड्या (47 धावा - 38 चेंडू) याची आश्‍वासक खेळी हेच मुंबईच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पंड्या व काही प्रमाणात कर्णधार रोहित शर्मा (24 धावा - 22 चेंडू) यांचा अपवाद वगळता मुंबईचा अन्य कुठलाही फलंदाज रायझिंग सुपरजायंट्‌सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे टिकाव धरु शकला नाही

हैदराबाद - अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर आज (रविवार) होत असलेल्या 10 व्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 'रायझिंग पुणे सुपरजायंटस' संघाने 'मुंबई इंडियन्स'ना अवघ्या 129 धावांत रोखण्यात यश मिळविले.

डाव सुरु झाल्यापासूनच नियमित अंतराने फलंदाज गमाविलेल्या मुंबई इंडियन्सना सावरण्याची संधीच पुण्याच्या संघाने दिली नाही. मुंबईचा डावखुरा शैलीदार फलंदाज कृणाल पंड्या (47 धावा - 38 चेंडू) याची आश्‍वासक खेळी हेच मुंबईच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पंड्या व काही प्रमाणात कर्णधार रोहित शर्मा (24 धावा - 22 चेंडू) यांचा अपवाद वगळता मुंबईचा अन्य कुठलाही फलंदाज रायझिंग सुपरजायंट्‌सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे टिकाव धरु शकला नाही. हार्दिक पंड्या व केरॉन पोलार्ड या मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना स्वस्तात माघारी परत धाडत सुपरजायंट्‌सच्या गोलंदाजांनी मुंबईस अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यास फारसा वाव ठेवला नाही.

पुण्याकडून मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट (19 धावा - 2 बळी) व फिरकीपटू ऍडम झंपा (32 धावा - 2 बळी) यांना वॉशिंग्टन सुंदर (4 षटके - 13 धावा), शार्दूल ठाकूर (2 षटके - 7 धावा) व डॅनियल ख्रिश्‍चियन (1 बळी) या अन्य गोलंदाजांनी पूरक साथ दिल्याने मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फलंदाजांना वेसण घालण्यास पुण्यास यश आले.

Web Title: IPL: Mumbai Indians 129/8 after 20 overs