esakal | चेन्नईचे पुनरागमन खरोखरच संस्मरणीय
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-gavaskar

चेन्नईचे पुनरागमन खरोखरच संस्मरणीय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नईने पराभवाच्या खाईतून गतविजेत्या मुंबईवर मिळविलेल्या विजयासह ११व्या ‘आयपीएल’ला सनसनाटी सुरवात झाली. संघात अष्टपैलू असण्याचे फायदे स्पष्टपणे दिसून आले. ब्राव्होने अद्वितीय खेळीच्या जोरावर चेन्नईला विजयानजीक नेले आणि जखमी असूनही केदार जाधवने थाटात शिक्कामोर्तब केले. त्याआधी ब्राव्होने अंतिम टप्प्यात धूर्त मारा करीत मुंबईला १८० धावसंख्येचा टप्पा गाठण्यापासून रोखले. तेवढी धावसंख्या गाठण्याचा मुंबईचा प्रयत्न होता, पण ब्राव्होने वेगवान यॉर्कर आणि मध्येच कमी वेगाचे चेंडू असे मिश्रण साधत ‘स्लॉग ओव्हर्स’मध्ये नेहमी दिसणारे उत्तुंग फटके मारण्यापासून मुंबईच्या फलंदाजांना रोखले. चेन्नईच्या डावात १६वे षटक पूर्ण झाले तेव्हा आवश्‍यक धावगती जवळपास ११ पर्यंत पोचली होती. त्यानंतरच ब्राव्होच्या टोलेबाजीच्या जोरावर चेन्नईने पारडे फिरविले. चेन्नईचे पुनरागमन खरोखरच संस्मरणीय ठरले. त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या ‘ॲक्‍शन’ तेवढ्या सफाईदार नव्हत्या; पण मोक्‍याच्या क्षणी त्यांना अनुभव उपयुक्‍त ठरेल. ब्राव्होने योजनाबद्ध धोका पत्करत हेच दाखवून दिले.

राजस्थान हा पुनरागमन करणारा दुसरा संघ आहे. चेन्नईची कामगिरी त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरक ठरेल. त्यांचा संघ संतुलित आहे. स्टीव स्मिथ नसला तरी शेन वॉर्न ‘मेंटॉर’ असल्यामुळे हा संघ भक्कम आहे. अजिंक्‍य रहाणे भावनांचे प्रदर्शन करणारा कर्णधार नसला, तरी तो अपेक्षित कामगिरी साध्य करतो. या प्रकारात त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर समावेश नसला तरी तो चांगल्या वेगाने धावा काढतो. तो षटकार फारसे खेचत नसला तरी चेंडू सीमापार करण्याच्या बाबतीत तो पिछाडीवर नक्कीच नसतो.

हैदराबादला डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीचा फटका बसेल; पण केन विल्यम्सनने त्याची जागा घेतली आहे. केनसाठी न्यूझीलंडमधील मोसम फार चांगला ठरला. त्याचे नेतृत्व छान विकसित झाले आहे. रहाणेप्रमाणेच तो भावभावनांचे जाहीर प्रदर्शन करीत नाही, पण तो धूर्त असून बहुतेक जणांपेक्षा परिस्थितीचा अंदाज सरस घेतो.

loading image
go to top