
Cricket News : अजिंक्य रहाणेचे १५ महिन्यांनंतर पुनरागमन
मुंबई : आयपीएलमध्ये सध्या करत असलेल्या स्फोटक आणि सातत्यपूर्ण खेळीचे बक्षिस अजिंक्य रहाणेला मिळाले आहे. जून महिन्याच्या सुरवातीस होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी रहाणेला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मैदानाबाहेर असल्यामुळे रहाणेला ही संधी मिळाली.
आयपीएल अगोदर मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात असलेल्या सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि ईशान किशन यांना वगळण्यात आले आहे. पाच सदस्यांची निवड समिती, बीसीसीआयच सचिव जय शहा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी हा निश्चित केला.
रहाणेने १५ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनगामन केले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर काही महिने दूर होता आता तर त्याच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शास्त्रक्रिया करण्यात आली आहे. रहाणे आपला अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०२२ मध्ये केप टाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
१९० चा स्ट्राईक रेट
भारतीय संघातून आणि बीसीसीआयच्या वार्षिक करारातूनही बाहेर गेलेल्या ३४ वर्षीय रहाणेने पुनरागमनासाठी आपले प्रयत्न कायम ठेवले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास ७०० धावा त्याने केल्याच, पण आयपीएलमध्ये वेगळेच आक्रमक रुप तो दाखवत आहे. चेन्नई संघातून तो खेळत आहे आणि आत्तापर्यंत खेळलेल्या सात सामन्यातून त्याचा स्ट्राईक रेट १९० असा आहे.
उपकर्णधाराची जागा रिकामी
एरवी परदेश दौऱ्यासाठी उपकर्णधार हमखास निवडला जातो, परंतु या कसोटी अजिंक्यपद सामन्यासाठी कोणाकडेही उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. विराट कोहली कर्णधार असताना रहाणे उपकर्णधार होता. त्यानंतर रोहितकडे कर्णधारपद देण्यात आल्यावर आणि त्याच वेळी रहाणेचा फॉर्म हरपलेला असताना केएल राहुल उपकर्णधार होता.
दक्षिण आफ्रिदा दौऱ्या रोहित दुखापतीमुळे खेळत नसताना राहुलने नेतृत्व केले होते. आता राहुल संघात असतानाही त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली नाही. आता गरज भासली तर चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपद दिले जाऊ शकते, सध्या तो इंग्लिश कौंटी स्पर्धेत ससेक्स संघाचे नेतृत्व करत आहे.
भारतीय संघ ः
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट