Ravindra Jadeja MS Dhoni Rift : सीएसकेच्या सीईओंचा तो व्हिडिओ व्हायरल, धोनी - जडेजा दुराव्यावर शिक्कामोर्तब? | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja MS Dhoni Rift CSK CEO Kasi Viswanathan

Ravindra Jadeja MS Dhoni Rift : सीएसकेच्या सीईओंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, धोनी - जडेजा दुराव्यावर शिक्कामोर्तब?

Ravindra Jadeja MS Dhoni Rift CSK CEO Kasi Viswanathan : चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करत रेकॉर्ड ब्रेक 10 व्यांदा आयपीएलची फायनल गाठली. सामन्याबद्दल बोलायचं झाले तर चेन्नईकडून अष्टपैलू रविंद्र जडेजाने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने फलंदाजीत शेवटची काही षटके राहिली असताना 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्यामुळेच सीएसके 172 धावांपर्यंत पोहचू शकली. तर गोलंदाजीत 4 षटकात फक्त 18 धावा देत डेव्हिड मिलर आणि दसुन शानका यांच्या विकेट्स घेतल्या.

रविंद्र जडेजाच्या या कामगिरीचे महेंद्रसिंह धोनीने देखील तोंडभरून कौतुक केले. धोनीने कौतुक केल्यामुळे या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे असे वाटले. दोन दिवस धोनी - जडेजामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दर्शवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. मात्र गुजरातविरूद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करून देखील रविंद्र जडेजा खूष नसल्याचे आढळून आले.

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ केसी विश्वनाथन आणि रविंद्र जडेजाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विश्वनाथन हे सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा हात हातात घेत त्याला काहीतरी समजावत असल्याचे दिसत आहे. मात्र रविंद्र जडेजा या व्हिडिओत फार खूष दिसत नाहीये.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीएसकेचे फॅन्स सोशल मीडियावर जडेजाला सीएसके न सोडण्याची विनंती करत आहेत. एका चाहत्याने तो खूष दिसत नाहीये असे लिहिले तर दुसऱ्या एका चाहत्याने काही काळजी करण्याचं कारण नाही जडेजा संपूर्ण सामन्यात हसत होता अशी प्रतिक्रिया दिली.

रविंद्र जडेजाने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. यात त्याने तुमचे कर्म आज नाही तर उद्या पुन्हा तुमच्यावरच उलटतात असे लिहिले होते. त्यावर त्याची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजाने स्वतःच्या मार्गावर चालत रहा अशी प्रतिक्रिया दिली होती. या दोघांच्या ट्विटमुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

रविंद्र जडेजाने मध्यंतरी चेन्नईच्या फॅन्सवर निशाणा साधला होता. त्यावेळी तो म्हणाला की, 'मी माही भाईच्या नावाच्या घोषणा ऐकत होतो. जर मी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत असलो तर प्रेक्षक माझ्या बाद होण्याची वाट पाहत असतात.'

(Sports Latest News)