
DC vs MI IPL 2023 : मुंबईचा शेवटच्या चेंडूवर थरारक विजय; दिल्लीचा पराभवाचा चौकार
Delhi Capitals vs Mumbai Indians : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्स राखून पराभव करत हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले होते. ते मुंबईने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
तत्पूर्वी, मुंबईने दिल्ली कॅपिटल्सची अवस्था 5 बाद 98 अशी केली होती. मात्र अक्षर पटेलने 25 चेंडूत 54 धावा चोपून दिल्लीला रूळावर आणले. दिल्ली आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच मुंबईच्या बेहरनडॉर्फने 19 व्या षटकात दिल्लीची अवस्था बिकट केली. अखेर दिल्लीचा डाव 172 धावात संपुष्टात आला. बेहरनडॉर्फने आपल्या तिसऱ्या आणि संघाच्या 19 व्या षटकात 1 धाव देत 3 विकेट्स घेतल्या. पियुषनेही 3 विकेट घेत दिल्लीची मधली फळी उडवली. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 47 चेंडूत 51 धावांची संथ खेळी केली.
रोहित शर्माचे अर्धशतक
इशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी डावखुऱ्या तिलक वर्माला बढती देऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजाला पाठवले. या दोघांनी 12 व्या षटकात संघाला शतकी मजल मारून दिली.
रोहित - किशनची दमदार सुरूवात
दिल्ली कॅपिटल्सच्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आक्रमक सुरूवात केली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये जवळपास 10 धावा प्रतीषटकाच्या सरासरीने धावा करण्यास सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 68 धावा वसूल केल्या. मात्र आक्रमक इशान किशन 26 चेंडूत 31 धावा करून धावबाद झाला. मुंबईला 71 धावांवर पहिला धक्का बसला.
बेहरेनडॉर्फचा धडाका
अक्षर पटेलने 25 चेंडूत ठोकलेल्या 54 धावांच्या जोरावर दिल्लीने 18 व्या षटकापर्यंत दिल्लीला 165 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र त्यानंतर बेहरेनडॉर्फने एकाच षटकात 1 धाव देत 3 बळी टिपले. यात षटकात कुलदीप यादव धावबाद देखील झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था 9 बाद 166 अशी झाली. अखेर दिल्लीचा डाव मुंबईने 20 षटकात 172 धावात संपवला.
अक्षर पटेल - वॉर्नरने दिल्लीला पोहचवले 150 पार
दिल्लीचा निम्मा संघ शंभरच्या आत गारद झाल्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला 150 पार पहोचवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतकी खेळी केली.
98-5 : पियुष चावलाच्या फिरकीत अडकली दिल्ली
डेव्हिड वॉर्नरचा झेल सोडणाऱ्या पियुष चावलाने गोलंदाजीत कामल करत दिल्लीची मधली फळी उडवली.
76-2 : मनिष पांडेची छोटी इनिंग संपली
मनिष पांडेने 5 चौकारांच्या सहाय्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. मात्र त्याची ही इनिंग पियुष चावलाने संपवली. यानंतर आलेला पदार्पण करणार यश धुल देखील 4 चेंडूत 2 धावा करून बाद झाला.
51/1 (6ov) :दिल्लीचे पॉवरप्लेमध्येच अर्धशतक
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ पॉवर प्लेमध्ये 15 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीला पॉवर प्लेमध्ये 51 धावांपर्यंत पोहचवले.
33-1 : शौकीनने दिल्लीला दिला पहिला धक्का
ऋतिक शौकीनने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉला 15 धावांवर बाद करत त्यांना पहिला धक्का दिला.
मुंबईने नाणेफेक जिंकली.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अरूण जेटली स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल कायमच महत्वाचा राहिला आहे. त्यामुळे रोहित सेनेने अर्धी लढाई तर जिंकली आहे. आता चांगला खेळ करून सामनाही खिशात घालणार का हे पहावे लागले.
मुंबई दिल्ली सर करून नारळ फोडणार?
मुंबई इंडियन्स आज दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर भिडणार आहे. या सामन्यातील विजेता हा यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय साजरा करेल.