
Team India: टीम इंडियाच्या या वनडे मालिकेवर संकटाचे ढग, BCCI रद्द करण्याचा घेऊ शकते निर्णय!
Team India Schedule : इंडियन प्रीमियर लीग आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. 28 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळल्या जाणार आहे. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 जूनपासून खेळली जाईल, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ इंग्लंडमधील ओव्हलवर आमनेसामने येतील.
त्याचबरोबर भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण डब्ल्यूटीसी फायनल आणि वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान टीम इंडियाला आणखी एक मालिका खेळायची होती, जी आता धोक्यात आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघ जूनमध्येच अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका आयोजित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत मालिका रद्दही होऊ शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान कॅरिबियन भूमीवर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये आशिया कप आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन खेळाडूंसाठी ब्रेकही आवश्यक असतो. 20 ते 30 जून दरम्यान भारतीय संघ अफगाणिस्तानसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकतो असे वृत्त होते, परंतु सध्या त्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ सध्या भारतात आहेत. आयपीएलची फायनल पाहण्यासाठी मीरवाइज अश्रफ येथे आले आहेत. त्याच वेळी 28 मे रोजी एसीसीची बैठक होणार आहे आणि त्या दरम्यान दोन्ही बोर्ड एकदिवसीय मालिकेबद्दल चर्चा करू शकतात. आशिया चषक 2023 बाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.