
CSK vs GT : गुजरातचा 'प्रभारी' कॅप्टन ठरला हिरो
पुणे : शेटवच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात डेव्हिड मिलरने झुंजार खेळी करत 51 चेंडूत 94 धावा चोपल्या. त्याला प्रभारी कर्णधार राशिद खाननने 40 धावांची तुफानी खेळी करत मोलाची साथ दिली. त्याच्या खेळी गुजरात सामन्यात परत आला. या सामन्यात सीएसके कडून ख्रिस जॉर्डनने अत्यंत स्वैर मारा केला. त्याने टाकलेल्या 18 व्या षटकात राशिदने 25 धावा चोपून सीएसकेच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला. (IPL 2022 Rashid Khan Blasting Batting Gujrat Titans Won Against Chennai Super Kings)
चेन्नईचे 170 धावांचे आव्हान घेऊन मैदनात आलेल्या गुजरातला पहिल्याच षटकात धक्का बसला. मुकेश चौधरीने शुभमन गिलला भोपळाही न फोडू देता पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. त्यानंतर चेन्नईचा फिरकीपटू महीश तिक्षाणाने विजय शंकर (०) आणि अभिनव मनोहरला (12) बाद करत गुजरातची अवस्था 3 बाद 16 अशी केली.
या पडझडीनंतर वृद्धीमान साहा आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने साहाला बाद करत हा प्रयत्न हाणून पाडला. पाठोपाठ ब्राव्होने तेवतियाला देखील बाद केले. गुजरातची अवस्था 5 बाद 87 अशी झाली.
त्यानंतर प्रभारी कर्णधार राशिद खानने तुफान फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. त्याने ख्रिस जॉर्डनच्या 18 व्या षटकात 25 धावा चोपून सामना रंगतदार स्थितीत आणला. राशिदने ब्राव्होला देखील चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्राव्होने खानची 22 चेंडूत 41 धावांची खेळी संपवली. आता शेवटच्या षटकात गुजरातला 13 धावांची गरज होती.
मात्र चोप पडलेल्या ख्रिस जॉर्डनला मिलरने षटकार ठोकत सामना 3 चेंडूत 7 धावा असा आणला. मात्र जॉर्डनने नो बॉल टाकून मिलरला आयते कोलित दिले. मिलरने फ्री हिटवर चौकार मारत सामना 2 चेंडू 2 धावा असा आणला. मिलरने पुढच्याच चेंडुवर दोन धावा करत सामना जिंकून दिला. मिलरने 51 चेंडूत नाबाद 94 धावांची विजयी खेळी केली.
आयपीएलच्या 29 व्या सामन्यात आज गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामीने रॉबिन उथप्पाला 3 धावेवर बाद करत गुजरातला चांगली सुरूवात करून दिली. मात्र यंदाच्या हंगामात ज्याची बॅट शांत होती त्या ऋतुराज गायकवाडची बॅट तळपायला सुरुवात झाली.
त्याने पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केली. दरम्यान, मोईन अलीने देखील त्याची साथ सोडली. मात्र सेट झालेल्या ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूने तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी 92 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, गायकवाडने अर्धशतक पूर्ण केले. मात्र जोसेफने रायुडूला 46 धावांवर बाद करत अर्धशतकाची संधी हिरावून घेतली.
त्यानंतर ऋतुराजने गिअर बदलत आक्रमक होण्याचा प्रयत्न केला मात्र यश दयालने त्याची 73 धावांची खेळी संपवली. त्यानंतर गुजरताच्या गोलंदाजांनी सीएसकेच्या रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेला फार हात खोलण्याची संधी दिली नाही. अखेर जडेजाने 20 व्या षटकात सलग दोन षटकात मारत सीएसकेला 169 धावांपर्यंत पोहचवले.
Web Title: Ipl 2022 Rashid Khan Blasting Batting Gujrat Titans Won Against Chennai Super Kings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..