गुजरात टायटन्सचे प्ले ऑफचे लक्ष्य; नवव्या विजयाची संधी | IPL 2022 Today Match GT vs PAKS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2022 today match gt vs paks

गुजरात टायटन्सचे प्ले ऑफचे लक्ष्य; नवव्या विजयाची संधी

IPL 2022 Today Match GT vs PAKS : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुजरात टायटन्सचा संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंतच्या ९ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये या संघाने विजय संपादन केला आहे. आता आणखी एक विजय मिळवून हार्दिक पांड्याचा संघ प्ले ऑफ निश्चित करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्यांच्यासमोर नवी मुंबईत आज होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्जचा अडथळा असणार आहे. त्यांच्यासाठीही ही लढत महत्त्वाची असणार आहे. आव्हान कायम राखण्यासाठी ते लढणार आहेत.

गुजरातने उद्याच्या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश पक्का समजला जाईल. सध्याचा या संघाचा फॉर्म बघता प्ले ऑफमध्ये पोहोचणारा हा पहिला संघ असण्याची दाट शक्यता आहे. हार्दिक, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान या खेळाडूंनी सामन्याला कलाटणी देणारी खेळी केली आहे. एवढेच नव्हे तर मिलर, तेवतिया व राशीद यांनी आतापर्यंत मिळून २८ षटकार चोपून काढले आहेत. मॅथ्यू वेडऐवजी संघात घेतलेला रिद्धीमान साहा व शुभमन गिल ही सलामी जोडीही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या संघातील सर्व फलंदाज दमदार खेळ करीत आहेत.

हेही वाचा: VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल

पराभवाचा वचपा काढणार?

पंजाब-गुजरात यांच्यामध्ये याआधी झालेल्या पहिल्या लढतीत तेवतिया याने अखेरच्या दोन चेंडूंवर सणसणीत षटकार खेचून गुजरातला विजय मिळवून दिला होता. ओडिसन स्मिथच्या गोलंदाजीवर तेवतियाने आक्रमक फलंदाजी केली होती. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पंजाबकडे असणार आहे.

शमी, फर्ग्युसन, राशीद, सांगवानवर मदार

गुजरातचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद शमी (१४ बळी), लॉकी फर्ग्युसन (१० बळी), राशीद खान (९ बळी), यश दयाल (७ बळी), अल्जारी जोसेफ (५ बळी), हार्दिक पंड्या (४ बळी) यांनी आतापर्यंत ठसा उमटवला आहे. प्रदीप सांगवान यानेही पुनरागमनाच्या लढतीत २ फलंदाज बाद करून आपली चुणूक दाखवली आहे. त्यामुळे पंजाबच्या फलंदाजांसमोर कडवे आव्हान असेल यात शंका नाही.

हेही वाचा: गावसकराचा दावा; T-20 वर्ल्डकप वेळी भारतीय यॉर्कर किंगची होणार धमाकेदार एंट्री

फलंदाजांना खेळ उंचवावा लागेल

पंजाबच्या फलंदाजांनी अद्याप चमकदार फलंदाजी केलेली नाही. शिखर धवन (३०७ धावा), लियाम लिव्हींगस्टोन (२६३ धावा), मयांक अगरवाल (१६१ धावा), भनुका राजपक्षे (१३४ धावा), शाहरुख खान (९८ धावा), जॉनी बेअरस्टो (७९ धावा) यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. शाहरुखला तर मागील लढतीत बाहेर बसवण्यात आले होते. फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. तसेच कागिसो रबाडा (१३ बळी) व राहुल चहर (१२ बळी) या दोघांनी आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बांधून ठेवले आहे. अर्शदीप सिंग यानेही प्रभावी कामगिरी केली आहे, पण इतर गोलंदाजांनाही दबावाखाली खेळ उंचवावा लागेल.

Web Title: Ipl 2022 Today Match Gt Vs Paks Punjab Kings Vs Gujarat Titans Play Off Target

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top