
Ricky Ponting IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्समध्ये बदलाचे वारे; पॉटिंगची होणार सुट्टी, 'या' भारतीयाचे नाव चर्चेत
Ricky Ponting IPL 2023 : आयपीएलचा 16 वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी फारचा चांगला केला नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले. मात्र दिल्लीला काही चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्ली सध्या गुणतालिकेत 8 गुणांसह तळात आहे. त्यांचे अजून फक्त दोन सामने शिल्लक आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या खराब कामगिरीनंतर संघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. दिल्लीचा हेड कोच रिकी पॉटिंग आपल्या पदावरून बाजूला होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. जर असे झाले तर दिल्लीचा कोच कोण होऊ शकतो याचेही अंदाज बांधले जात आहेत. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने या चर्चेत उडी घेत एका भारतीय दिग्गजाचे नाव सुचवले आहे.
इरफान पठाणला रिकी पॉटिंगनंतर रिक्त झालेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचपदी सौरव गांगुली योग्य वाटतोय. कारण तो भारतीय खेळाडूंची मानसिकता चांगलीच ओळखतो.
इरफान पठाण स्टार स्पोट्सशी बोलताना म्हणाला की, 'दिल्लीच्या डग आऊटमध्ये सौरव गांगुलीची उपस्थिती ही खूप मोठी बाब आहे. मला असे वाटते की दादाकडेच आता कोच पदाची देखील जबाबदारी द्यावी. तो या संघात मोठा बदल घडवून आणू शकतो. भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेबद्दल सैरव गांगुलीला चांगले ज्ञान आहे. त्याला ड्रेसिंग रूम कसे चालवायचे हे माहिती आहे. दिल्लीने याचा नक्कीच फायदा उचलायला हवा. वॉर्नरने नाणेफेकीवेळीच सांगितले की, त्यांचा संघ पुढच्या हंगामाची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर सौरव गांगुलीची संघातील भुमिका बदलेली तर नवल वाटायला नको.'
दिल्लीने यंदाच्या हंगामात त्यांच्या क्षमतेपेक्षा फार सुमार कामगिरी केली आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे संघाची धुरा डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र त्याला संघाकडून उत्तम कामगिरी करून घेता आली नाही. त्याची स्वतःची कामगिरी देखील लौकिकास साजेसी राहिली नाही. ऋषभ पंत पुढच्यावर्षी दिल्लीच्या संघात परतेल आणि तोच संघाचे नेतृत्व करेल.