IPL 2023 Final: मुंबई इंडियन्सचा खेल खल्लास! गुजरात चेन्नईमध्ये जेतेपदाची झुंज, कोण होणार चॅम्पियन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians Out ipl 2023

IPL 2023 Final: मुंबई इंडियन्सचा खेल खल्लास! गुजरात चेन्नईमध्ये जेतेपदाची झुंज, कोण होणार चॅम्पियन?

IPL 2023 Final : शुभमन गिलच्या ६० चेंडूंतील १२९ धावांच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर गतविजेत्या गुजरात टायटन्सने शुक्रवारी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सवर ६२धावांनी विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. मोहीत शर्माने पाच फलंदाज बाद करीत गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले. आता येत्या रविवारी चेन्नई सुपरकिंग्स - गुजरात टायटन्स यांच्यामध्ये अजिंक्यपदाची लढत होणार आहे.

गुजरातकडून मुंबईसमोर २३४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. ख्रिस जॉर्डनचा कोपरा लागल्यामुळे डोळ्याला इजा झालेला इशान किशन फलंदाजीसाठी उतरला नाही. त्याच्याऐवजी रोहित शर्मासोबत नेहल वधेरा फलंदाजीला आला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर वधेरा ४ धावांवर बाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याचा चेंडू कॅमेरुन ग्रीन हाताला लागला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

याच दरम्यान शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळताना रोहित जॉश लिटलकरवी ८ धावांवर झेलबाद झाला. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव या जोडीने झटपट धावा करीत मुंबईचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. पण राशीद खानच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा ४३ धावांवर बाद झाला. त्याने १४ चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने ही खेळी साकारली.

तिलक बाद झाल्यानंतर ग्रीन पुन्हा फलंदाजीला मैदानात आला. त्याने सूर्यकुमार यादवच्या साथीने किल्ला लढवायला सुरुवात केला. पण जॉश लिटिलच्या गोलंदाजीवर तो ३० धावांवर त्रिफळाचीत झाला. सूर्यकुमारने एकाकी झुंज दिली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. मोहीत शर्माच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर त्याच षटकात विष्णू विनोदही बाद झाला. मुंबईचा डाव १७१ धावांवरच संपुष्टात आला. मोहीत शर्माने १० धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दरम्यान, याआधी पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात गिलला जीवदान मिळाले. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर टीम डेव्हिडने मिड ऑनला झेल सोडला. अर्थात हा झेल सोपा नव्हता. पण तरीही तो मुंबईला प्रचंड महाग पडला. गिलने त्यानंतर धावांचा पाऊस पाडला. पियूष चावलाच्या गोलंदाजीवर साहा यष्टिरक्षक इशान किशनकरवी यष्टिचीत १८ धावांवर झाला. हार्दिक पंड्याने नाबाद २८ धावांची आणि राशीद खानने नाबाद ५ धावांची खेळी केली. गुजरातने २० षटकांत ३ बाद २३३ धावा फटकावल्या.

आयपीएलमधील तिसरे शतक

शुभमन गिलने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धावांचा पाऊस पाडला आहे. या लढतीत त्याने या मोसमातील तिसरे शतक झळकावले. आतापर्यंत गिलने १६ सामन्यांमधून तीन शतके व चार अर्धशतकांच्या जोरावर ८५१ धावा फटकावल्या आहेत. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१६मध्ये ९७३ धावा फटकावल्या होत्या. जॉस बटलर याने २०२२मध्ये ८६३ धावा केल्या होत्या.