IPL 2023 : सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलमध्ये प्ले ऑफ; सर्व सहकाऱ्यांचा अभिमान - हार्दिक पंड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2023 gt vs srh hardik pandya after gt confirm top two finish weve rightly earned our spot play off cricket sport

IPL 2023 : सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलमध्ये प्ले ऑफ; सर्व सहकाऱ्यांचा अभिमान - हार्दिक पंड्या

अहमदाबाद : आमच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षीही आयपीएल प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले, याबाबत मला सर्व सहकाऱ्यांचा अभिमान आहे, असे मत गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर सांगितले.

गतवर्षी आमचे पदार्पण होते. सर्वच जण स्वतःला सिद्ध करत होते. त्यातून लय सापडत गेली आणि आम्ही प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. हे वर्ष वेगळे आहे. अनेक आव्हाने उभी राहू शकतात, याची जाणीव होती; तरीही प्रत्येकाने कठीण परिस्थितीतही लढण्याची जिगर दाखवली, त्यामुळे हा प्रवास शक्य झाला, असे हार्दिकने सांगितले.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ गाठणारा गुजरातचा संघ पहिला ठरला आहे. हार्दिक पुढे म्हणाला, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे हा आमचा हक्कच होता. आपण गतविजेते आहोत. त्यामुळे आपल्याकडून अधिक अपेक्षा असणार, याची जाणीव मी सहकाऱ्यांना करून देत होतो. ज्या ज्या कमतरता होत्या त्या त्या आम्ही पूर्ण करत होतो.

प्ले ऑफ गाठण्याच्या या प्रवावास आम्ही काही चुका केल्या; पण सातत्याने चांगला खेळ केला. काही सामने गमावले असले, तरी आम्ही पूर्णपणे सामन्याच्या बाहेर नव्हतो. जिंकण्याची संधी कायम होती. संघातील प्रत्येक जण सकारात्मक विचारावर ठाम आहे, अशा शब्दात हार्दिकने आपल्या सहकाऱ्यांचे कौतूक केले.

गोलंदाज अधिक जवळचे

बहुतांश वेळा फलंदाजांना अधिक श्रेय दिले जाते; पण गोलंदाज हे माझ्या हृदयाजवळ असतात. टी-२० प्रकारात दोन-चार षटके नेहमीच महत्त्वाची असतात. मी स्वतः गोलंदाज-कर्णधार आहे त्यामुळे गोलंदाजांना नेहमीच श्रेय द्यायला पुढे असतो, असे हार्दिकने सांगितले.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने १०१ धावांची खेळी केली असली, तरी गुजरातला प्रथम फलंदाजी करताना १८८ धावाच करता आल्या होत्या. गिल आणि साई सुदर्शन यांचा अपवाद वगळता गुजरातचे इतर सर्व फलंदाज एकेही धावांत बाद झाले. ही धावसंख्या गुजरातचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी निर्णायक ठरवली. या दोघांनी प्रत्येकी चार विकेट मिळवल्या.

टॅग्स :CricketIPLhardik pandya