
IPL Today Match LSG vs GT: पहिल्या दोन संघांत वर्चस्वाची लढाई
IPL 2022: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचे दोन सर्वोत्तम संघ आज पुण्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. लखनौ सुपरजायंटस् व गुजरात टायटन्स या दोन नवख्या अर्थातच या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या संघांमध्ये या वेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच लागणार आहे.(IPL Today Match LSG vs GT)
सुरुवातीच्या तीन लढती जिंकल्यानंतर एक लढत गमावणाऱ्या गुजरातने नंतर पाचही लढतींमध्ये विजय मिळवला; मात्र मागील दोन लढतींमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब व मुंबई या दोन संघांनी फॉर्ममध्ये असलेल्या गुजरातला हरवण्याची करामत करून दाखवली. आता या दोन पराभवांनंतर पुन्हा विजयपथावर येण्यासाठी हा संघ प्रयत्न करील.(KL Rahul vs Hardik Pandya IPL 2022)
हेही वाचा: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर
कर्णधार हार्दिक पंड्या (३३३ धावा), शुभमन गिल (३२१ धावा), डेव्हिड मिलर (३०६ धावा), रिद्धिमान साहा (२०९ धावा), राहुल तेवतिया (१९३ धावा), साई सुदर्शन (१४५ धावा) यांच्या खांद्यावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. हार्दिक, शुभमन हे वरच्या क्रमांकावर महत्त्वपूर्ण खेळी साकारत आहेत. मिलर, तेवतिया व राशीद खान हे मधल्या फळीत जबरदस्त फलंदाजी करीत प्रतिस्पर्ध्यांकडून सामना खेचून आणत आहेत. आगामी लढतींमध्येही त्यांच्याकडून हीच अपेक्षा बाळगली जाईल.
शमी, फर्ग्युसनवर मदार
लखनौचा कर्णधार राहुल याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याला रोखण्याची जबाबदारी मोहम्मद शमी (१५ बळी), लॉकी फर्ग्युसन (१२ बळी) या गुजरातच्या दोन वेगवान गोलंदाजांवर असणार आहे. हे दोन्ही गोलंदाज या मोसमात छान कामगिरी करीत आहेत. राशीद खान हा अनुभवी फिरकी गोलंदाज त्यांच्या दिमतीला आहेच. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये फक्त ६.८४ च्या सरासरीने धावा दिल्या असून यादरम्यान ११ फलंदाजांना बाद केले आहेत.
हेही वाचा: "माझा नवरोबानी आग लावली आग..."; बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नीचे ट्विट व्हायरल
लखनौचे फलंदाज दमदार फलंदाजी करीत आहेत. राहुलने २ शतके व २ अर्धशतकांसह ४५१ धावांचा पाऊस पाडला आहे. राहुलचा साथीदार क्विंटोन डी कॉक यानेही ३४४ धावा फटकावल्या आहेत. दीपक हुडाने (३२० धावा) चमकदार खेळी केली आहे.
दोन्ही संघांचे ८ विजय
लखनौ व गुजरात हे दोन्ही संघ सध्या समान पातळीवर आहेत. लखनौ व गुजरात या दोन्ही संघांनी आतापर्यंत ११ लढती खेळल्या असून प्रत्येकी आठ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तसेच तीन लढतींमध्ये पराभव झाला आहे. लखनौचा नेट रनरेट ०.७०३ इतका असल्यामुळे त्यांचा संघ पहिल्या स्थानावर आहे. गुजरातचा संघ ०.१२० नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांमध्ये फक्त नेट रनरेटचा फरक आहे.
Web Title: Ipl Today Match Lsg Vs Gt Kl Rahul Vs Hardik Pandya Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..