
Mohammed Shami : शमीच्या वादळात दिल्लीची उडाली दैना, अखेर अमन - अक्षरने वाचवली लाज
Mohammed Shami Gujarat Titans vs Delhi Capitals : पॉईंट टेबलमध्ये अव्वल असणाऱ्या गुजरात टायटन्सविरूद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना 20 षटकात 8 बाद 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून मोहम्मद शमीने 4 षटकात 11 धावा देत 4 बळी टिपले. अखेर अमन हकीम खानने 51 धावांची अर्धशतकी तर अक्षर पटेलने 27 धावांची खेळी करत दिल्लीची लाज वाचवली. दिल्लीकडून मोहित शर्माने देखील 2 बळी टिपले.
गुणतालिकेतील तळात असलेल्या दिल्लीचा उरला सुरूला आत्मविश्वास आज मोहम्मद शमीने घालवून टाकला. गुजरातने दिल्लीला पहिल्या 5 षटकात 5 धक्के दिले. यातील 4 विकेट्स एकट्या मोहम्मद शमीने घेतल्या. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावा करून धावबाद झाला. शमीने सॉल्टला पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद केले. त्यानंतर रिले रूसोला 8 तर मनिष पांडेला 1 धावेवर बाद केले. पाठोपाठ पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियम गर्गला 10 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली. शमीने दिल्लीची अवस्था 5 षटकात 5 बाद 23 धावा अशी केली.
मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी केल्यानंतर अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. ही जमलेली जोडी शतकी मजल मारून देणार असे वाटत असतानाच मोहित शर्माने 30 चेंडूत 27 धावा करणाऱ्या अक्षर पटेलला बाद केले.
अक्षर बाद झाल्यानंतर अमनने डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. त्याला रिपल शर्माने आक्रमक साथ दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर (51) राशिद खानने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला 126 धावांवर 7 वा धक्का दिला. यानंतर डावाचे शेवटच्या षटकात मोहित शर्माने चांगले स्लोअर वन टाकत फक्त 3 धावा दिल्या. त्याने रिपल शर्माला 23 धावांवर बाद करत आपली 100 वी आयपीएल विकेट देखील साजरी केली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार