
IPL 2023 DC vs PBKS : दिल्लीकडून पंजाबच्या आशेवर पाणी; लिव्हिंगस्टोनची झुंज अपयशी
धरमशाला : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी पंजाब किंग्सचा पाय खोलात नेला. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरीत दोन्ही लढतींमध्ये विजय आवश्यक असलेल्या पंजाब किंग्सला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
आता त्यांचा अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा प्रवास खडतर झाला आहे. इतर संघांच्या निकालावर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पाचव्या विजयाला गवसणी घातली. पंजाब किंग्सचा सातवा पराभव झाला.
दिल्लीकडून पंजाबसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. दिल्लीने दुसऱ्याच षटकात पंजाबला मोठा धक्का दिला. इशांत शर्माने शिखर धवनला शून्यावरच बाद केले. त्याचा झेल स्लीपमध्ये उभ्या अमन खान याने टिपला.
यंदाच्या मोसमातील शतकवीर प्रभसिमरन सिंग यालाही चमक दाखवता आली नाही. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो २२ धावांवर बाद झाला. अथर्व तायडे व लियाम लिव्हिंगस्टोन या जोडीने विजयासाठी झुंज दिली. पण ५५ धावांवर असताना अथर्व रिटायर्ड हर्ट (जखमी निवृत्त) झाला.
त्यानंतर जितेश शर्मा (०) व शाहरुख खान (६ धावा) यांचाही निभाव लागला नाही. लियाम लिव्हिंगस्टोनने ४८ चेंडूंमध्ये ९४ धावांची खेळी साकारत विजयासाठी प्रयत्न केले. या खेळीत त्याने ५ चौकार व ९ षटकार मारले. त्याची झुंज एकाकी ठरली. पंजाबला २० षटकांत ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघात या लढतीसाठी पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ या सलामी जोडीने ९४ धावांची भागीदारी केली.
पृथ्वी व रायली रुसो या जोडीने ५४ धावांची भागीदारी रचली. या दोन्ही फलंदाजांनी धावांचा ओघ कायम राखला. सॅम करननेच पृथ्वी याला बाद करीत जोडी तोडली. पृथ्वी याने ३८ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली. त्याने आपली खेळी ७ चौकार व १ षटकाराने सजवली.
रुसोचा झंझावात
रायली रुसो याने या लढतीत आयपीएलमधील पहिले अर्धशतक साजरे केले. रुसो व फिल सॉल्ट या जोडीने नाबाद ६५ धावांची भागीदारी केली. दिल्लीला २० षटकांत २ बाद २१३ धावा फटकावता आल्या. रुसोने ३७ चेंडूंमध्ये ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक ः दिल्ली २० षटकांत २ बाद २१३ धावा (डेव्हिड वॉर्नर ४६, पृथ्वी शॉ ५४, रायली रुसो नाबाद ८२, फिल सॉल्ट नाबाद २६, सॅम करन २/३६) विजयी वि. पंजाब २० षटकांत ८ बाद १९८ धावा (अथर्व तायडे ५५, लियाम लिव्हिंगस्टोन ९४, इशांत शर्मा २/३६, ॲनरीक नॉर्खिया २/३६).