
PBKS vs MI : मुंबईने पंजाबचे 215 धावांचे मोठे आव्हान केले पार, 6 विकेट्सनी सामना जिंकून गाठले सहावे स्थान
Punjab Kings vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या दमदार 116 धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्जचे 215 धावांचे आव्हान 18.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदाल्यात पर करत सामना 6 विकेट्सनी खिशात टाकला. मुंंबईकडून इशान किशनने 75 धावांची तर सूर्यकुमार यादवने 66 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 10 चेंडूत 29 धावा चोपून सामना षटकाराने संपवले. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत 10 गुणांसह सहावे स्थान पटकावले.
पंजाब किंग्जने मुंबईविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 3 बाद 214 धावा ठोकत मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला जितेश शर्माने नाबाद 49 धावा करून चांगली साथ दिली. मुंबईकडून पियुष चावलाने 2 तर अर्शद खानने एक विकेट घेतली.
सूर्या - किशन जोडी जमली
मुंबईच्या 54 धावा झाल्या असताना ग्रीन बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी आक्रमक अर्धशतके ठोकत मुंबईचे दीडशतक 14 व्या षटकात धावफलकावर लावले. सूर्या - किशनने शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी 116 धावांपर्यंत नेत या दोघांनी मुंबईला 15 षटकात 170 धावांपर्यत पोहचवले.
आता सामना मुंबईच्या आवाक्यात आला होता. मात्र एलिसने सूर्यकुमारला 66 धावांवर तर अर्शदीप सिंगने इशान किशनला 75 धावांवर बाद करत मुंबईचे टेन्शन वाढवले. परंतु टीम डेव्हिड आणि तिलक वर्माने नाबाद 38 धावांची भागीदारी रचत मुंबईचा विजय 19 व्या षटकातच साकरला. वर्माने 10 चेंडूत 26 तर डेव्हिडने 10 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या.
मुंबईची सुरूवात खराब
पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरूद्ध विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात ऋषी धवनने रोहित शर्माला शुन्यावर बाद केले. यानंतर कॅमरून ग्रीन आणि इशान किशन यांना डाव सावरत मुंबईला पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र नॅथन एलिसने ग्रीनला 23 धावांवर बाद केले.
लिव्हिंगस्टोनने 200 च्या स्ट्राईक रेटने चोपले
लिव्हिंगस्टोनने अर्धशतक ठोकले त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी करत 42 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्याला साथ देणाऱ्या जितेश शर्माने 24 चेंडूत नाबाद 49 धावा ठोकल्या या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 119 धावांची भागीदारी रचत पंजाबला 20 षटकात 3 बाद 214 धावांपर्यंत पोहचवले.
लिम लिव्हिंगस्टोन - जितेश शर्माची आक्रमक फलंदाजी
शिखर धवन बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्टही 26 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र लिम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजबला 170 धावांच्या पार पोहचवले. लिव्हिंगस्टोनने 32 चेंडूत आपले अर्धशतक ठोकले.
PBKS 62/2 (7.2) : पंजाबची दमदार सुरूवात मात्र मुंबईनेही दिले धक्के
नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंजाबनेही पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात करत 7 षटकात साठी पार केली. अर्शद खानने प्रभसिमरन सिंगला 9 धावांवर बाद केल्यानंतर शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला अर्धशतक पार करून दिले होते. ही जोडी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करणार इतक्यात पियुष चावलाने 20 चेंडूत 30 धावा करणाऱ्या शिखर धवनला बाद केले.