
चेन्नईचा विजयपथ कायम राहणार?; चौथा पराभव टाळण्याचे बंगळूरसमोर आव्हान
IPL 2022 : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. फाफ ड्युप्लेसिसच्या बंगळूर संघाला या वेळी सलग चौथा पराभव टाळायचा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जला विजयी पथावर कायम राहायचे आहे. याआधी दोन संघांमध्ये झालेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला होता.
हेही वाचा: IPL: ...म्हणून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली; पराभवानंतर पांड्याचं धक्कादायक विधान
बंगळूर संघाने आतापर्यंत १० सामन्यांमधून ५ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. यापुढील चारही लढती या संघासाठी निर्णायक ठरणार आहेत. या संघातील फलंदाजांनी आतापर्यंत फक्त ७ अर्धशतके झळकावली आहेत. प्रमुख खेळाडू विराट कोहली याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल; पण तरीही त्याच्यासह ड्युप्लेसिस, रजत पटीदार, ग्लेन मॅक्सवेल यांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. दिनेश कार्तिक फिनीशर म्हणून आपली कामगिरी चोख बजावत आहे.
सातत्याचा आभाव
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. वनिंदू हसरंगाने १५ फलंदाज बाद केले असून, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने १० व हर्षल पटेलने १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. मोहम्मद सिराजने ८ फलंदाज बाद केले आहेत. मात्र महम्मद सिराजच्या कामगिरीत चढउतार प्रकर्षाने दिसून येतो. शाहबाज अहमद व तडाखेबंद फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांनाही आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.
हेही वाचा: World Junior Weightlifting: ज्ञानेश्वरीची रौप्य पदकाची कमाई; देशाची मान उंचावली
धोनीचे नेतृत्व व ॠतुराजमध्ये बदल
जडेजाने चेन्नई संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या लढतीत धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवला. या लढतीत ऋतुराज गायकवाड (९९ धावा) व डेव्होन कॉनवे (नाबाद ८५) या दोघांनी चमकदार कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वात ऋतुराजचा खेळ बहरतो. याची झलक मागील मोसमात पाहायला मिळाली आहे. यापूर्वी ऋतुराज अपयशी ठरला होता.
धावा देण्याची सरासरी जास्तच
चेन्नई संघातील गोलंदाजांना या मोसमात धमक दाखवता आलेली नाही. याच कारणामुळे गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट (धावा देण्याची सरासरी) ७.५४ च्या वर आहे. फिरकी गोलंदाज माहीश थिकशाना याने ७.५४ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. इतर गोलंदाजांची इकॉनॉमी जास्त आहे. ड्वेन ब्राव्हो (१४ बळी), मुकेश चौधरी (११), जडेजा (५) या सर्वांना सुधारणा करावी लागणार आहे.
Web Title: Rcb Vs Csk Faf Du Plessis Surprised Ms Dhoni Return Captaincy Ipl Today Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..